

कोल्हापूर; चंद्रशेखर माताडे : राज्यातील राजकीय घडामोडीत कोल्हापूर जिल्ह्यात बरेच बदल झाले आहेत. शिवसेनेचे दोन्ही खासदार, एक आमदार, एक सहयोगी व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष हे खंदे शिलेदार शिंदे गटात गेल्याने राजकारण नव्या वळणावर आले आहे. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात वर्चस्व कुणाचे हे सिद्ध होणार आहे. शिंदे गट व भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय संघर्ष अटळ आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या 92 जागांसाठी लढत होणार आहे. यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट व भाजप या सामन्यात फार मोठी राजकीय उलाढाल होणार आहे. यापूर्वी बंडखोरी टाळण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा व निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन करण्याचे ठरविले होते. आता बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी एकत्र लढेल, असे चित्र आहे. त्यांचा सामना शिंदे गट व भाजपाशी होईल.
कोल्हापूर जिल्हा परिषदेतही 76 जागांसाठी लढत होत असून या ठिकाणी महापालिकेप्रमाणे लढत अपेक्षित आहे. पंचायत समित्यांमध्ये चित्र थोडे वेगळे असेल. स्थानिक आघाड्यांचे राजकारण जोरात असेल. पंचायत समितीतील सत्ता मिळविण्यासाठी तालुक्यातील मोठ्या कार्यकर्त्यांची प्रसंगी नेत्याला या निवडणुकीमध्ये बाजूला ठेवून स्थानिक पातळीवर आघाड्या करून निवडणुका लढविण्याची मानसिकता असते. त्यामुळे येथे चित्र थोडे वेगळे असेल; मात्र सत्ता स्थापनेच्या घोळात नेत्यांचा शब्द अंतिम असतो.
जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. तेथेही थोड्याफार प्रकारे पंचायत समित्यांप्रमाणे स्थानिक आघाड्यांचे चित्र असेल. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेत्यांना त्यांचे राजकीय स्थान दाखवतील. त्यामुळे नेत्यांनाही आपण नेमके कुठे आहोत हे समजणार आहे.