

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : बदलत्या जीवनशैलीत आनंदी, तणावमुक्त व निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, मन:शांती या त्रिसूत्रीचा वापर करा. त्यासाठी दररोज अर्धा तास स्वत:ला वेळ द्या, असा सुद़ृढ आरोग्याचा कानमंत्र आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शल्यविशारद डॉ. अविनाश सुपे यांनी शनिवारी दिला. 'डॉक्टर्स डे'च्या निमित्ताने दै. 'पुढारी' आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत 'परिपूर्ण आरोग्य' या विषयावर डॉ. सुपे बोलत होते.
गर्दीने खचाखच भरलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहात डॉ. सुपे यांनी या व्याख्यानमालेचे 20 वे पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल, दै. 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, डॉ. वसंत शेणॉय व्यासपीठावर उपस्थित होते.
सुखी व आनंदी जीवन जगण्यासाठी आपले आरोग्य व आपले अर्थकारण यांची योग्य सांगड आपल्याला घालता आली पाहिजे. पैसा मिळविण्यासाठी आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे सांगत डॉ. सुपे म्हणाले, स्वतःच्या आरोग्यासाठीही दररोज किमान अर्धा तास वेळ द्यायला हवा. आरोग्य आणि अर्थ, यामध्ये समतोल राखा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण करिअरसाठी आणि यशस्वी होण्यासाठी किती धावपळ करतो. आपण आपल्या आवडीनिवडी, छंद जोपासण्यासाठी, स्वत:ला, मित्रांना आणि कुटुंबीयांना वेळ देत नाही. त्यामुळे जीवनात ताणतणाव वाढतो. परिणामी, आजारपणाला तोंड देण्याची वेळ आपल्यावर येते, असेही डॉ. सुपे यांनी सांगीतले.
जीवनशैली बदलली; आजारपणे वाढली
धावपळीचे आणि धकाधकीचे जीवन जगताना आपली जीवनशैलीच पूर्णपणे बदलली असल्याचे सांगून डॉ. सुपे म्हणाले, आपल्या शारीरिक हालचाली बंद झाल्या आणि बैठ्या कामाची पद्धत वाढली. पूर्वी शालेयजीवनात पाटी, पेन्सिल घेऊन आपण शिकत होतो. आता स्मार्ट बोर्ड आले. टी.व्ही., मोबाईल, लॅपटॉप आणि व्हॉटस्अॅप आले आहे. यामुळे आपल्या शारीरिक हालचालीच बंद झाल्या. त्याचा मोठा परिणाम पचनक्रियेवर झाला असून, ती कमकुवत बनली आहे. बैठ्या कामामुळे स्थूलता वाढल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब यासह विविध आजारांनी लोकांना जडले आहे.
फॅटी लिव्हरचे वाढते प्रमाण
पूर्वी केवळ दारू पिणार्यांनाच लिव्हरचे आजार होतात, असा समज होता. मात्र, आता बदलती जीवनशैली आणि स्थूलपणामुळे यकृताच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये फॅटी लिव्हरचे प्रमाण सर्वाधिक आहे. 100 लिव्हर सिरोयसिसच्या रुग्णांमध्ये 50 रुग्ण हे फॅटी लिव्हर असलेले असतात. दरवर्षी सुमारे सव्वादोन लाख लोक लिव्हरच्या आजाराने मरण पावतात. अनेक रुग्णांना लिव्हर ट्रान्स्फर करण्याची आवश्यकता असते. परंतु, सुविधा नसल्याने देशात वर्षाला केवळ दीड ते दोन हजार लिव्हर ट्रान्स्फरच्या केसेस होतात, असेही डॉ. सुपे यांनी यावेळी सांगितले.
कर्करोगाचे वाढते प्रमाण
देशात कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. एका पाहणी अहवालानुसार, आपल्या देशात स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. आपल्याकडे सुविधा कमी आहेत. पैशांची कमतरता आहे. त्यामुळे अनेक लोकांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागतात, असे
डॉ. सुपे यांनी सांगितले.
आरोग्य, आयुष्यात चांगले गुण मिळावेत
परीक्षेत चांगले गुण मिळाले आणि आरोग्य बिघडलेले असेल, तर त्याचा काहीच उपयोग नाही. मुलांवर चांगले गुण मिळविण्यासाठी त्यांना सर्व साधने पुरवीत असतानाच त्यांचे आरोग्यही चांगले राहील, याकडे लक्ष देणेदेखील महत्त्वाचे असल्याचे डॉ. सुपे म्हणाले.
मांसाहार वाढला, कुस्ती विसरली
मांसाहार करावा की नको, असा एक प्रश्न श्रोत्यांमधून आला होता. त्याला उत्तर देताना डॉ. सुपे यांनी कोल्हापूर ही कला, क्रीडानगरी आहे. कुस्तीची परंपरा येथे आहे. मटण, तांबडा-पांढरा रस्सा हे कोल्हापुरात प्रसिद्ध आहे; पण त्या जोडीला आपली कुस्तीची परंपरा आपण विसरलो आहोत. मांसाहाराबरोबर कुस्ती आणि शारीरिक कसरतीही करा. मांसाहार करताना सॅलेड खा, असा सल्लाही त्यांनी दिला.
संगीतातून तणावमुक्ती
मधुमेह, रक्तदाब यासह मानसिक आजारांची सुरुवात ताणतणावातून होते. म्हणून आपण ताणतणाव टाळण्यासाठी मनाला नियमितपणे रिलॅक्स केले पाहिजे. रोजची देवाची प्रार्थना, ध्यानसाधना करणे, शवासन केल्यास ताणतणावातून मुक्ती मिळते. आवडीची गाणी व संगीत ऐकल्यासही ताण नियंत्रित करता येतो, असा सल्लाही डॉ. सुपे यांनी दिला.
प्रश्नोत्तरांतून श्रोत्यांचे शंका निरसन
व्याख्यानमालेच्या दुसर्या सत्रात श्रोत्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना डॉ. सुपे यांनी समर्पक उत्तरे दिली. विशेषतः, आहार आणि जीवनशैलीविषयीचे प्रश्न उपस्थित झाले. डॉ. सुपे यांनी प्रत्येक पदार्थाचा आहारामध्ये आनंद घ्यावा. मात्र, त्याचा अतिरेक टाळावा, असे सांगताना अन्न संस्काराचे उदाहरण दिले. पूर्वी जेवणाच्या ताटामध्ये डाव्या बाजूला लोणचे, मीठ यांचा समावेश होता; तर उजवीकडे डाळ, सुकी डाळ, वरण, भाकरीचा समावेश होता. माणूस जेवताना डावीकडे कमी आणि उजवीकडे जास्त वळतो. डावीकडील पदार्थ कमी आणि उजवीकडील पदार्थ जास्त खावेत, हा त्यामागचा उद्देश होता.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून या व्याख्यानमालेची सुरुवात झाली. दै. 'पुढारी'चे कार्यकारी संपादक विजय जाधव यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन विक्रम रेपे यांनी, तर व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. सुपे यांनी दिल्या टिप्स
टी.व्ही., मोबाईल बघत जेवण करू नका. चोथायुक्त पालेभाज्यांचा समावेश जेवणात करा. जेवणासाठी किमान अर्धा तास वेळ द्या. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करा. दररोज किमान 40 मिनिटे चालावे. योगासने किंवा शारीरिक कसरती कराव्यात. वयाच्या चाळिशीनंतर वर्षातून एकदा महत्त्वाच्या तपासण्या करून घ्या. बैठे काम करणार्यांनी एकसारखे बसून न राहता अधूनमधून उठावे. थोडे चालावे. शांत झोप आणि सकस अन्न घ्यावे. जेवणात मिठाचे आणि साखरेचे प्रमाण कमी करा. तेलाऐवजी तुपाचा वापर केल्यास चांगले. मांसाहारासोबत सॅलेडही खा. तसेच वय वाढेल तसे आहारावर नियत्रंण ठेवा.
जेवण मांडी घालूनच करणे
भारतीय संस्कृतीप्रमाणे आपली जीवनशैली असावी, असे सांगत डॉ. सुपे म्हणाले, पूर्वी आपण जमिनीवर पाठ ठेवून जेवायला बसत होतो. त्यामुळे आपण कमी खात होतो. पोटावर ताण पडत असे आणि पचनक्रियाही व्यवस्थित होत होती. आता आपण डायनिंग टेबलवर आरामात बसून जेवतो. त्यामुळे दोन पोळ्या जास्तच जातात. परिणामी, स्थूलतेचे प्रमाण वाढत आहे.