कोल्हापूर : शिवाजी पार्क परिसरात आग; 20 झोपड्या जळून खाक

कोल्हापूर : शिवाजी पार्क परिसरात आग; 20 झोपड्या जळून खाक
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी पार्क परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टीला मंगळवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत झोपड्या जळून खाक झाल्या. दुर्घटनेत 25 लाखांचे नुकसान झाले आहे. कटलरी साहित्य, रोकड, धान्य, कपडे भस्मसात झाल्याने झोपडपट्टीवासीयांचा संसार उघड्यावर आला आहे. महिलांसह मुलांचा आक्रोश मन हेलावणारा होता. सुदैवाने प्राणहानी टळली.

मनपा अग्निशमन दलातील जवानांच्या दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. संजय भीमा सोनझरी, धनाजीराव सोनझरी, संजय हणमंत सोनझरी, अनिल हणमंत सोनझरी, स्वामी सोनझरी, भीमा आप्पा सोनझरी, तुळजाप्पा राजू सोनझरी, काळाप्पा चंदाप्पा अंकुशे, लखन आप्पा सोनझरी, शंकर आप्पा सोनझरी, सुभाष मधुकर सोनझरी, बच्चन हणमंत सोनझरी, शिवाजी आप्पा सोनझरी, राजेश आप्पा सोनझरी, हणमंत सोनझरी यांच्यासह 20 जणांच्या झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.

मुलांसह चिमुरड्यांना आगीबाहेर काढले

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी, शिवाजी सोनझरी, गणेश सोनझरी, विनोद सोनझरी, मारुती सोनझरी, भीमा सोनझरी यांच्यासह झोपडपट्टीतील तरुणांनी जीव धोक्यात घालून झोपडपट्टीतील लहान मुलांसह महिला, शाळकरी मुलांना आगीच्या ज्वालांतून बाहेर काढले. गॅस सिलिंडर वेळीच हलवल्याने गंभीर घटना टळली.

शिवाजी पार्क परिसरात चाळीस-पंचेचाळीस वर्षांपासून इंदिरा झोपडपट्टीमध्ये नागरिकांचे वास्तव्य आहे. मंगळवारी दुपारी एक वाजता झोपडपट्टीतून धूर येऊ लागला. क्षणार्धात परिसरातील सर्वच झोपड्यांनी पेट घेतला. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी 20 ते 25 तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून मदतकार्य सुरू केले.

दुर्घटनेत सर्वच झोपड्यांमधील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. त्यात कपड्यांसह कटलरी साहित्य, विक्रीसाठी आणलेली भांडी, खुर्च्या, दूरदर्शन संच, मोबाईल, लाकडी कपाटे, शाळकरी मुलांची दप्तरे, कडधान्यही बेचिराख झाले. आप्पा सोनझरे यांनी कटलरी व्यवसायासाठी नातेवाईकांकडून उसनवार आणलेली दीड लाखाची रोकडही बॅगेसह खाक झाल्याचे दिसून येत होते.

भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच मनपा आयुक्त कादंबरी बलकवडे, खासदार धनंजय महाडिक, आमदार जयश्री जाधव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी व पोलिसांचा फौजफाटाही मदतीसाठी दाखल झाला.

महापालिकेच्या वतीने तात्पुरत्या निवासाची व्यवस्था

आगीत झोपड्या खाक झाल्याने महापालिकेच्या वतीने नागरिकांसाठी तात्पुरत्या निवार्‍याची व्यवस्था करण्यात आली आहे. चित्रदुर्ग मठात राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पिण्याच्या पाण्यासह आंघोळीचीही सोय करण्यात आली आहे.

अग्निशमन दलातील जवानांचे शर्थीचे प्रयत्न

आग आटोक्यात आणण्यासाठी मनपा अग्निशमन दलातील अधिकारी, जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, उपायुक्त रविकांत आडसूळ, जलअभियंता हर्षजित घाटगे, मनीष रणभिसे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news