कोल्हापूर शहरात आता पुन्हा फुटबॉलचा थरार

कोल्हापूर शहरात आता पुन्हा फुटबॉलचा थरार
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोरोनामुळे गेले दोन वर्षे फुटबॉल हंगाम ठप्प आहे. कोल्हापूर शहरातील अवघी तरुणाई फुटबॉल सामन्यांच्या प्रतीक्षेत आहे. परंतु लवकरच फुटबॉलप्रेमींना मनमुरादपणे सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. महापौर चषकाने फुटबॉल हंगामाचा थरार सुरू होणार आहे.

महापालिकेने त्यासाठी पुढाकार घेतला असून जिल्हा प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. विनाप्रेक्षक महापौर चषकातील सेमी फायनल व फायनलचे सामने खेळविण्यात येणार आहेत. कोल्हापूरचे फुटबॉलप्रेम जगजाहीर आहे. प्रत्येक पेठेची फुटबॉलची टीम आहे. पावसाळा संपल्यावर कधी एकदा फुटबॉलचा हंगाम सुरू होतो याकडे तरुणांचे डोळे लागलेले असतात. मात्र गेले दोन वर्षे कोरोनामुळे कोल्हापुरात फुटबॉलचे सामने झालेले नाहीत. परिणामी दोन वर्षे शाहू स्टेडियमही फुटबॉलच्या आणि खेळाडूंच्या प्रतीक्षेत असल्याचे वास्तव आहे. अन्यथा रोज पहाटे सरावापासून सायंकाळी सामने आणि ते पाहण्यासाठी होणारी गर्दी हे समीकरणच बनले होते.

2019 मधील महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्टिस क्लब फायनलमध्ये पोहोचली आहे. दिलबहार व फुलेवाडी यांच्यात सेमी फायनल आहे. हे दोन्ही सामने कोरोनामुळे स्थगित करण्यात आले होते. आता हे दोन्ही सामने खेळवून फुलबॉल हंगाम सुरू करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. फुटबॉलप्रेमींनी महापालिकेकडे तशी मागणी केली आहे. विनाप्रेक्षक फुटबॉल सामने खेळविण्यात काहीच अडचण नसल्याने त्यासाठी महापालिका प्रशासनाचीही मान्यता असल्याचे समजते. त्यासंदर्भात महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडेही परवानगी मागितली असल्याचे सांगण्यात आले.

महापौर चषकाचे उर्वरित सामने 

2019 मध्ये महापौर चषक फुटबॉल स्पर्धा झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यातील शेवटचे सामने खेळवता आले नाहीत. गेले दोन वर्षे फुटबॉल सामने झालेले नाहीत. परंतु आता बहुतांश क्रीडा प्रकारांना परवानगी मिळाली आहे. विनाप्रेक्षक सामने खेळवावे यासाठी महापालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे. येत्या काही दिवसांतच महापौर चषकातील उर्वरित सामने खेळवता येतील, असे माजी महापौर निलोफर आजरेकर व फुटबॉलपटू, माजी नगरसेवक सचिन पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news