कोल्हापूर : राजकारण गोकुळचे; तयारी महापालिका, जिल्हा परिषदेची

कोल्हापूर : राजकारण गोकुळचे; तयारी महापालिका, जिल्हा परिषदेची
Published on
Updated on

कोल्हापूर; चंद्रशेखर माताडे : 'गोकुळ'च्या सत्तांतराला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सत्तांतर घडविलेल्या नेत्यांनी वर्षभरातील कारकिर्दीचा आढावा घेतला. यातून जे काही सांगायचे ते सांगून झाले. मात्र, त्यातून अपेक्षेप्रमाणे जे काही आरोप व्हायचे ते झालेच. त्याची प्रतिक्रियाही तेवढ्याच ताकदीने आली; पण कारण जरी 'गोकुळ'चे असले तरी यामागे खरे राजकारण आहे ते महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपालिकेच्या निवडणुकांचे आणि उपकथानक राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे आहे.

'गोकुळ'मध्ये सत्ता नव्हती त्यावेळी हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी आरोप करताना कसलीही कसर सोडली नाही. हसन मुश्रीफ यांनी त्याहीपूर्वी 'गोकुळ'चे संचालक पाण्यात पडले तरी त्यांना सोडणार नाही, अशी घोषणा केली होती. मुश्रीफ ज्या संचालकांविरोधात बोलले होते, याचपैकी दोघा नेत्यांना सोबत घेऊनच त्यांनी सत्तांवर घडविले आहे.

आपल्यावर हल्ला होण्यापूर्वीच आपणच हल्ला चढविणे हा राजकारणातील चाणाक्षपणा असतो. तो प्रत्येक नेता व पक्ष करत असतो. हा हल्ला करण्याचे टायमिंग चुकले तर राजकारण बिघडते. टायमिंगला महत्त्व असते. 'गोकुळ'च्या माध्यमातून नेमके तेच सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी महाविकास आघाडी असली तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे पक्ष स्वतंत्रपणाने लढणार आहेत.

त्यामागे आपल्या कार्यकर्त्यांना संधी देणे हा जसा दृष्टिकोन आहे, तसाच आताच आघाडी केली तर तीनही पक्षांत नाराजी मोठ्या प्रमाणावर होईल व भाजपला आयते तगडे उमेदवार मिळतील. त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून सर्वांनी लढायचे व निवडणुकीनंतर गोळाबेरीज करून महाविकास आघाडी स्थापन करायची, असे राजकारण सुरू आहे.

त्यामुळे 'गोकुळ'च्या व्यासपीठावरून आरोप झाले, त्यावर प्रत्यारोपही झाले. यापुढे निवडणुका जसजशा जवळ येतील तशी आरोपांना धार येईल. सतेज पाटील गट विरुद्ध महाडिक गट, हसन मुश्रीफ गट विरुद्ध समरजितसिंह घाटगे गट अशा चकमकी हा त्याचाच एक भाग आहे.

भाजपची ताकद वाढली

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या मतांमध्ये तब्बल 22 टक्के, तर महाविकास आघाडीच्या मतांमध्ये 2.23 टक्के वाढ झाली. भाजपच्या मतांमध्ये झालेली वाढ ही नेत्यांच्या चिंतेचा विषय असू शकतो. भाजपच्या उमेदवारामागे महाडिक गटाची ताकद होती. भाजपने महाडिक गटाच्या ताकदीवर उत्तरच्या पोटनिवडणुकीत जी मते मिळविली, ती पाहता राजकीय उपाययोजना करणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे व तसेच ते सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news