

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर-मुंबई मार्गावर 'स्टार एअर'ची मंगळवार (दि. 4) पासून विमानसेवा सुरू होत आहे. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी विमान मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे. यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या या मार्गावर पुन्हा नवी विमानसेवा सुरू होत आहे. आठवड्यातून तीन दिवस ही सेवा उपलब्ध राहणार आहे. पहिल्या फेरीपासूनच या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून सोमवारी सायंकाळपर्यंत 88 टक्क्यांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे.
केंद्र शासनाच्या 'उडान' योजनेतर्गंत 'स्टार एअर'च्या वतीने मंगळवार, गुरुवार आणि शनिवार अशी आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा सुरू केली आहे. सकाळी साडेदहा वाजता मुंबईहून कोल्हापूरसाठी विमानाचे टेकऑफ होणार असून कोल्हापूर विमानतळावर सकाळी 11 वाजून 20 वाजता त्याचे लँडिंग होईल. यानंतर 11 वाजून 50 मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून टेक ऑफ होऊन त्याचे मुंबईत दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी लँडिंग होणार आहे.
कोल्हापूर-मुंबई या मार्गासाठी 2 हजार 573 रुपयांपासून पुढे तिकीट दर आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमान प्रवास करता येणार आहे. उद्या सकाळी साडेनऊ वाजता कोल्हापूर विमानतळावर या विमानसेवेचा उद्घाटन सोहळा होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने पहिल्या फ्लाईटला 'वॉटर सॅल्यूट' देण्यात येणार आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे. कोल्हापूर विमानतळावरील आयोजित कार्यक्रमात शाहू महाराज, जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचे 'स्टार एअर'चे चेअरमन संजय घोडावत यांनी सांगितले.
कोल्हापूर-मुंबई मार्गावर उडान योजनेतून स्टार एअरला यापूर्वीच मान्यता मिळाली होती. मात्र, धावपट्टीचे विस्तारीकरण न झाल्यामुळे कंपनीने सेवा सुरू केली नव्हती. धावपट्टीचे 1 हजार 930 मीटरपर्यंत विस्तारीकरण झाले आहे. त्यापैकी 1 हजार 780 मीटरच्या धावपट्टीच्या वापरास डीजीसीएने मान्यता दिल्यानंतर कंपनीने तत्काळ सेवा सुरू केली.
कोल्हापूर-मुंबई मार्गावर यापूर्वी ट्रू जेट कंपनीची सेवा सुरू होती. मात्र या सेवेत सातत्य राहिले नाही. 16 जानेवारी 2022 पासून कंपनीने या मार्गावरील सेवा पूर्णपणे बंद केली. या मार्गावर नियमित सेवा सुरू करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यानंतर कोल्हापूर-मुंबई मार्गावर पहिल्या टप्प्यात आठवड्याूतन तीन दिवस नव्या कंपनीची सेवा सुरू झाली आहे. आठवड्यातून सातही दिवस ही सेवा सुरू करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू असून लवकरच ही सेवा सुरू होईल, अशीही शक्यता आहे.
कोल्हापूर सध्या हैदराबाद, तिरुपती आणि अहमदाबाद या शहरांशी जोडलेले आहे. मात्र राज्याची राजधानी मुंबईसाठीच विमानसेवा नव्हती. ती आता उपलब्ध झाली आहे. यामुळे अवघ्या 55 मिनिटांत कोल्हापुरातून मुंबईत जाता येणार आहे. उद्योजक, व्यापारी आदींसह अन्य कारणांनी प्रवास करणार्यांची यामुळे मोठी सोय झाली आहे. कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू झाल्याने कोल्हापूरच्या पर्यटन, व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्रालाही चालना मिळण्यास मदत होणार आहे.
अशी असेल विमानसेवा
आठवड्यातून दर मंगळवार, गुरुवार व शनिवारी विमानसेवा
मुंबईतून सकाळी 10.30 वा. टेकऑफ; कोल्हापुरात 11.20 वा. लँडिंग
कोल्हापुरातून स. 11.50 वा. टेकऑफ; मुंबईत 12.45 वा. लँडिंग
कोल्हापूर-मुंबईसाठी 2 हजार 573 रुपयांपासून पुढे तिकीट