कोल्हापूर : बास्केट ब्रिज-शिवाजी पूल रस्ता केंद्र निधीतून : नितीन गडकरी

कोल्हापूर : बास्केट ब्रिज-शिवाजी पूल रस्ता केंद्र निधीतून : नितीन गडकरी
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरचा विकास करायचा आहे. पैशांचा विचार तुम्ही करू नका. माझ्या विभागाकडे खूप पैसे आहेत. शहरातील शिवाजी पूल ते बास्केट ब्रिज हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करू, जरूर तेथे उड्डाणपूलही बांधू. कोल्हापुरात वाहननिर्मिती उद्योगासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे कोल्हापूरला ऑटोमोबाईल हब बनवू, कोल्हापूर-सांगली सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठीही निधी देऊ, अशा अनेक घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी येथे केल्या.

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने पंचगंगा नदीवरून शहरात प्रवेश करणार्‍या बास्केट ब्रिजचा पायाभरणी समारंभ व रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, माजी आमदार महादेवराव महाडिक आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सांगली फाटा येथे झाला.

महापुरातही वाहतूक खोळंबणार नाही

पंचगंगा नदीला कितीही पूर आला आणि कोल्हापुरात कितीही पाऊस झाला, तरी भविष्यात कधीही कोल्हापूरमधील ट्रॅफिक थांबणार नाही, असे सांगून नितीन गडकरी म्हणाले, बास्केट ब्रिजमुळे कोल्हापूरला एक वेगळे वैभव मिळणार आहे. महापुरातही कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग व इतर शहरांशी कनेक्ट राहील. दुसरा महत्त्वाचा रस्ता म्हणजे कोल्हापूर-सांगली हा रस्ता होय. आघाडीचे सरकार असताना भुजबळ यांनी 'बीओटी'तून हा रस्ता केला होता. पुढे या रस्त्याचे खूप प्रॉब्लेम झाले. आता खासदार संजयकाका पाटील, धैर्यशील माने यांनी मागणी केल्याप्रमाणे कोल्हापूर-सांगली हा संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रीटचा बनवला जाईल. पुढच्या 50 वर्षांत या रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही, याचीही गॅरंटी मी देतो.

खासदार संजयकाका पाटील यांच्याकडे पाहत भूमिपूजन मात्र तुम्ही उरकून घ्या. साडेपाच लाख कोटींची महामार्गांची कामे सुरू आहेत. प्रत्येक ठिकाणी मी भूमिपूजन आणि उद्घाटनाला जायचे म्हटले तर मला 365 दिवस पुरणार नाहीत.

हातकणंगलेत ड्रायपोर्ट

कोल्हापूर हा शेती, उद्योग क्षेत्रात आघाडीवर असणारा जिल्हा आहे. त्यामुळे येथील शेतकर्‍यालाही निर्यातदार बनविले पाहिजे. त्यासाठी कोल्हापुरात ड्रायपोर्ट तयार केला जाईल. त्याला रेल्वेशी कनेक्ट केले जाईल, यामुळे कोल्हापूरच्या विकासाची दारे मोठ्या प्रमाणात खुली होणार आहेत. साखर निर्यातीसाठी याचा मोठा फायदा होणार आहे. हातकणंगलेतील 400 एकर जागा मिळाली तर पुढची जबाबदारी केंद्र सरकार म्हणून आमची राहील, अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.

शहरासाठी 75 इलेक्ट्रिक बसेस द्या : खा. महाडिक

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, बास्केट ब्रिजची संकल्पना मांडली तेव्हा असा कुठे ब्रिज असतो काय म्हणत विरोधकांनी त्याची खिल्ली उडविली. अतिशय खालच्या पातळीवर राजकारण करण्यात आले. शहराच्या विकासाऐवजी त्यांनी स्वत:च्या विकासासाठी आणि भ्रष्टाचारासाठी सत्तेचा वापर केला. सातारा-कागल महामार्गाच्या कामात बचत होणार्‍या रकमेपैकी काही रक्कम शहरातील ओव्हरब्रिजसाठी द्यावी तसेच शहरासाठी 75 इलेक्ट्रिक बसेस द्याव्यात. तावडे हॉटेल चौकात उच्च दर्जाचा जो आयलँड तयार होणार आहे त्या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहूरायांचा पुतळा उभारावा. त्यामुळे येणारा प्रत्येक नागरिक त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊनच शहरात प्रवेश करेल.

ढपल्यामुळे विकास थांबला : चंद्रकांत पाटील

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूर शहरातील रस्ते रुंद करण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी करावयाची झाल्यास त्याला ओव्हरब्रिज हाच पर्याय आहे. यासाठी शहरात वीस ओव्हरब्रिज करावे लागतील. ज्या ठिकाणी ब्रिज संपतो तेथील जमीन अधिग्रहण करावी लागते. त्यासाठी निश्चित पाठपुरावा केला जाईल. यापूर्वीच्या सत्ताधार्‍यांनी केवळ ढपला पाडण्याचे काम केले आहे. रस्ते दुरुस्तीचा प्रकल्प आणला त्यात ढपला पाडला. कामे आणायची आणि ढपला पाडायचा, यामुळे कोल्हापूरचा विकास मधल्या काळात थांबला. आता शहराचे व्हिजन असणारी मंडळी सत्तेवर आहेत. निधी कमी नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केवळ प्रस्ताव दाखल करायचा, निधी उपलब्ध होतो.

जयपूरसारखे कोल्हापूर बनविण्याचा प्रयत्न : पालकमंत्री

पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, कोल्हापूर हे एक ऐतिहासिक सुंदर शहर आहे. आपण येथे राहता; पण ते आपणास दिसत नाही. त्यामुळे कोल्हापूर शहराला जयपूरसारखे ऐतिहासिक सुंदर शहर बनविण्याचा माझा प्रयत्न आहे. कोल्हापूर, आंबोली पुढे बांद्यापर्यंत रस्ता नेण्याचे गडकरी यांनी मान्य केले आहे. परंतु, कोल्हापूर किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पोर्ट नाही. तसेच कर्नाटक सीमाभागातही बंदर नाही. त्यामुळे हा रस्ता रेड्डीपर्यंत न्यावा.

खा. धैर्यशील माने यांनी, सांगली -कोल्हापूर रस्त्याच्या कामाबरोबरच हातकणंगले येथे ड्रायपोर्ट उभा करावा. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यांतील कृषिमालाच्या निर्यातीची सोय उपलब्ध होईल. रेल्वे व रस्त्यांचे जाळे सागरीमार्गाला जोडल्यास भविष्यात त्याचा फायदा होईल, असे सांगितले.

खा. संजय मंडलिक यांनी 2019 मध्ये मीदेखील विरोधक असल्यामुळे बास्केट ब्रिजची खिल्ली उडविली होती, अशी कबुली देत धनंजय महाडिक यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर हा पूल बांधण्याचे स्वप्न साकारले, असे सांगितले. सांगलीचे खा. संजय पाटील यांनी कोल्हापूर-सांगली रस्त्याचे काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी केली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे महाप्रबंधक प्रशांत तोडणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आवाडे, माजी आ. अमल महाडिक, शौमिका महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, भाजपचे संघटनमंत्री मकरंद देशपांडे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news