

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : हमालीच्या दरात वाढ झालीच पाहिजे, या मागणीवर माथाडी कामगार ठाम राहिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित केलेली बैठक निष्फळ ठरली. अन्य कामगार घेऊन शुक्रवारपासून गुळाचे सौदे सरू करा, अशी सूचना प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी समिती प्रशासनाला दिली. त्यानुसार सकाळी पोलिस बंदोबस्तात गूळ सौदे काढण्यात येणार आहेत. संपात सहभागी झालेल्या माथाडी बोर्डाकडे नोंदीत 260 माथाडी (हमाल) कामगांराना निलंबित करण्यासंदर्भात बाजार समितीने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीमध्ये दरवाढ मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार हमाल संघटनेच्या नेत्यांनी केला; पण दरवाढ देण्यास शेतकरी, अडते, व्यापारी यांनी नकार दर्शवला. गुळाचे सौदे जास्त दिवस थांबून चालणार नाहीत. त्यासाठी उद्यापासून अन्य कामगार घेऊन गूळ सौदे सुरू करा, अशी सूचना शिंदे यांनी दिली. या बैठकीला जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे, माथाडी बोर्डाचे निरीक्षक किशोर खैरे, सचिव जयवंत पाटील यांच्यासह अडते, व्यापारी यांचे प्रतिनिधी व हमाल कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.