

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीचे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या सूचनांनुसार संवर्धन केले जाणार आहे. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक राहुल रेखावार यांनी सोमवारी (दि. 19) सांगितले. करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची तातडीची दुरुस्ती पूर्ण झाली असून, ती दर्शनासाठी खुली केल्याचेही त्यांनी सांगितले.
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवाची तयारी वेगाने सुरू आहे. या तयारीदरम्यान श्री अंबाबाईच्या मूर्तीच्या एका बाजूला झीज झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत जिल्हाधिकार्यांनी तातडीने पावले उचलत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकार्यांना कोल्हापुरात बोलावून घेतले आणि ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
जिल्हाधिकारी रेखावार यांनी याबाबत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला पत्र पाठवले. त्यानंतर सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञांच्या पथकाने शनिवारी (दि. 10) अंबाबाई मंदिराला भेट देऊन मूर्तीची पाहणी केली. त्यानंतर मूर्तीची तातडीने दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार तज्ज्ञांच्या पथकाने रविवारी (दि. 18) मूर्तीची दुरुस्ती हाती घेतली. सोमवारी (दि. 19) सकाळी दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर ती भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली.
याबाबत जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, मूर्तीची तातडीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. झीज झालेला भाग पूर्ववत करण्यात आला आहे; मात्र भविष्यात मूर्तीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्याबाबत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर करणार आहे. हा अहवाल येत्या 8-10 दिवसांत उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे. अहवालामध्ये संवर्धनासाठी ज्या सूचना असतील त्यांची तातडीने अंमलबजावणी सुरू केली जाईल. ही अंमलबजावणी करावी लागली, तर त्यानुसार नवरात्रौत्सवानंतर संवर्धनाचे काम हाती घेतले जाईल, असेही रेखावार यांनी स्पष्ट केले.