कोल्हापूर : ‘पुढारी शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल’चा आज शेवटचा दिवस
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरकरांना फॅशनच्या कपड्यांपासून ज्वेलरीपर्यंत, प्युरिफायरसारख्या होम अॅप्लायन्सेसपासून मोबाईल अॅक्सेसरिजपर्यंत, चटपटीत खाद्यपदार्थांपासून खेळण्यांपर्यंत, अशा वैविध्यपूर्ण वस्तूंच्या खरेदीसह लज्जतदार मेजवानीचा मनसोक्त आनंद देणार्या दै. 'पुढारी' आयोजित शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलने सोमवारी यशस्वितेची मोहर उमटवली. या प्रदर्शनाचे सहप्रयोजक रॉनिक स्मार्ट वॉटर हिटर, मीडिया पार्टनर कलर्स मराठी वाहिनी तर आइस्क्रीम पार्टनर क्रेझी आइस्क्रीम आहे.
दै.'पुढारी' आणि टोमॅटो एफ.एम., कस्तुरी क्लबतर्फे फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल ग्राऊंड येथे पाच दिवसांपासून सुरू असणार्या या प्रदर्शनात कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतील प्रमुख कलाकारांनी प्रदर्शनाला भेट दिली. या मालिकेतील लतिका (अक्षया नाईक ) आणि देवा (कुणाल धुमाळ) या कलाकारांनी उपस्थितांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांची मने जिंकली. आयडीआय अॅकॅडमी, नृत्यांगना कला अकादमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला प्रेक्षकांनी दाद दिली. यामध्ये त्रिशा ओसवाल, वल्लभ साठे, अनुष्का प्रजापती, अनुष्का बठेजा, दीपिका भोसले, मधुरा पराडकर यांचा सहभाग होता. तसेच प्रियांका जाधव, आराध्या चव्हाण, सर्वेश पाटील, आरव सावंत यांनी सामूहिक नृत्याचे सादरीकरण केले. मिसेस कस्तुरी सौंदर्य स्पर्धेचे परीक्षण अॅड. वर्षा पाटील, कला दीक्षा अकादमीचे स्टिव्हन पावलस यांनी केले.
फेस्टिव्हलमध्ये ताणतणावाच्या जीवनशैलीत डाएट फूड, सेंद्रीय धान्य, स्वच्छ पाणी, आयुर्वेदिक, औषधी, नैसर्गिक उत्पादनांना प्राधान्य देणार्या चोखंदळ ग्राहकांची आवड-निवड आणि त्यांच्या बजेटचा विचार करून स्टॉल मांडण्यात आले आहेत. लघू उद्योजकांपासून ते मोठ्या कंपन्यांपर्यंतच्या विविध ब्रँडस्च्या आकर्षक वस्तू या उत्सवात पाहायला आणि खरेदी करायला मिळतात. एकाच छताखाली अख्ख्या कुटुंबाच्या खरेदीचा आनंद देणारा हा उत्सव कोल्हापूरमधील खवय्येगिरीलाही तृप्त करणारा आहे.
मुलांच्या खेळण्यांपासून तरुणाईसाठी दुचाकी, चारचाकी गाड्या, अॅक्सेसरिज, तरुणींसाठी नव्या ट्रेंडचे कपडे, बांगड्या, मोत्याचे दागिने, आयुर्वेद, पंचकर्म, बिस्किटे, फॅशनचे चप्पल, शूज, थ्रेडिंग ज्वेलरी, आवडत्या डिझायनर साड्या, गृहसजावटीच्या वस्तू , पडदे, कव्हर, महिलांचे काम हलके करणार्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, अत्याधुनिक गॅजेटस्, फायनान्स, शेंगदाणा चटणीसह चटण्यांचे विविध प्रकार, घरी बनविलेली चॉकलेट, तिळाचे लाडू, चक्की, विविध प्रकारची पिठे, सर्वप्रकारची लोणची, खाकरा, फॅशन आणि लाईफ स्टाईल अशा सर्व प्रकारच्या सेवा वस्तूंचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. मंगळवारी (दि. 27 ) 'शेतकरीच नवरा हवा' फेम सयाजी (प्रदीप घुले), रेवा (ऋचा गायकवाड) सायंकाळी 6 वाजता संवाद साधणार आहेत. तर एव्हरीग्रीन मेलडीज कार्यक्रमाचे अमर इस्लामपुरे सादरीकरण करणार आहेत.

