

कोल्हापूर, अनिल देशमुख : जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महापालिकांची नवी सभागृहे आता नव्या वर्षातच अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या निवडणुकांबाबत काम होणार्या विभागात सध्या शुकशुकाट आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडूनही कोणतेही आदेश नाहीत. यामुळे ज्या टप्प्यावर या निवडणुकांचे काम थांबले होते, त्या टप्प्यापासून या कामात पुढे काहीही हालचाल झालेली नाही. राज्य निवडणूक आयोगाकङून नोव्हेंबर महिन्यात राज्यातील मुदत संपणार्या 7 हजारांहून अधिक ग्रा.पं.च्या निवडणुका घेतल्या जातील, अशीच शक्यता आहे.
सध्या केवळ याच निवडणुकांचे काम सुरू आहे. जि.प., पं.स., नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुका घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधी आणि त्यासाठी कर्मचार्यांची उपलब्धता या सर्वांचा विचार करता या सर्व निवडणुका येत्या दोन-तीन महिन्यांत होतील, याबाबत साशंकता आहे. निवडणूक आयोगाने तत्काळ जरी प्रक्रिया सुरू केली, तरी प्रभाग रचना, त्याचे आरक्षण, मतदारयादी या सर्व बाबी पूर्ण होण्यासाठी डिसेंबरमधील दुसरा, तिसरा आठवडा उजाडेल. यानंतर निवडणुकीची घोषणा व आचारसंहितेचा कालावधी याचा विचार करता निवडणुका झाल्या, तरी नवीन सभागृहे अस्तित्वात यायला नवे वर्षच उजाडणार आहे.
जिल्हा परिषद निवडणूक मार्चमध्ये होण्याची शक्यता
जिल्हा परिषदेच्या निवडणुका मार्च महिन्यात होतील आणि त्यापूर्वी नगरपालिका आणि महापालिका निवडणुका होतील, अशी शक्यता अधिकार्यांनी व्यक्त केली. राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने गतीने प्रक्रिया राबविली आणि डिसेंबरपर्यंत निवडणुका झाल्या, तरी सभागृहे नव्या वर्षातच अस्तित्वात येतील, अशी शक्यता आहे.
नवी सभागृहे नव्या वर्षात का?
१. वर्ष 2022 संपण्यास पावणेतीन महिन्यांचाच कालावधी शिल्लक
२. निवडणूक प्रक्रियेसाठी किमान अडीच महिन्यांचा कालावधी आवश्यक
३. प्रभाग रचना, आरक्षण, मतदारयाद्यांसाठी 3 महिन्यांपेक्षा जादा कालावधी
४. उपलब्ध कर्मचारी, साधनसामग्रीचा विचार करता एकत्र निवडणुका अशक्य
५. सध्या काम सुरू केले, तरी तयारीसाठी चार महिन्यांचा कालावधी लागणार