

कोल्हापूर, दिलीप भिसे : दुनिया झुकती है… झुकानेवाला चाहिए! अशीच काहीशी स्थिती शहरासह जिल्ह्यात अनुभवाला येत आहे. अल्प मुदतीत दामदुपटीच्या आमिषाचे जणू पेव फुटले आहे. अशिक्षितांबरोबर उच्चशिक्षित, उद्योग, व्यावसायिकांसह मध्यमवर्गीय घटकही फसव्या योजनांना भुलून हजारात नव्हे, तर लाखोंच्या उलाढाली करीत आहेत. सराईत टोळ्या रातोरात गाशा गुंडाळत असतानाही आलिशान कार्यालयात आजही गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधींच्या उलाढाली झडत आहेत. दीड वर्षांत दोन डझनांवर गुन्हे दाखल होऊन दोन-अडीच हजारांवर गुंतवणूकदारांना सुमारे 1 हजारांवर कोटींची झळ सोसावी लागत आहे.
तीन महिन्यांत दामदुप्पट, आकर्षक गिफ्ट, हवाई सफर, परदेशी टूर जणू काहीही मागा… सर्व काही पुरविण्याची यंत्रणा… सोयी- सुविधांची जणू खैरातच… पैसाच पैसा… तोंडाला पाणी सुटलेल्या गुंतवणूकदारांनी कंपन्यांच्या कथित म्होरक्यांसह एजंटांवर विश्वास ठेवून लाखोंची गुंतवणूक केली आहे.
घर, शेतावर कर्जे उचलून, पत्नीचे दागिने गहाणवट, विक्री करून सराईत टोळ्यांचा भरणा केला आहे. फसव्या कंपन्यांकडून कोट्यवधींच्या रकमांची फसवणूक झाल्याचे उघड होताच जिल्ह्यातील अगणित गुंतवणूकदार हतबल झाले आहेत. त्यांच्यासह कुटुंबीयांचेही धाबे दणाणले आहेत.
दामदुपटीच्या आमिषाने फसवणूक; शाहूपुरी बनले सेंटर
कमी कालावधीत दामदुपटीपेक्षाही अधिक रकमांचा परतावा मिळवून देण्याचा अलीकडच्या काळात एक नवा फंडाच सुरू झाला आहे. शहर, ग्रामीण भागात एजंटांची साखळी तयार करून, आकर्षक पगारासह घसघशीत कमिशन, परदेशी टूर, एव्हाना दिमतीला मनसोक्त रंगेल पार्ट्या… अगदी सारे काही… बड्या गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढून त्यांचे खिसे रिकामे करण्याचा फंडा सुरू झाला आहे. येथील मध्यवर्ती शाहूपुरी आणि राजारामपुरी परिसरात दीड-दोन वर्षांत अनेक नवनवीन कंपन्यांची कार्यालये थाटण्यात आली आहेत.
11 कंपन्यांकडून 2 हजारांवर गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा
शाहूपुरीसह राजारामपुरी परिसरात दीड वर्षात किमान 20 ते 25 कथित कंपन्यांनी दोन हजारांवर गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्याचे पोलिस दप्तरी रेकॉर्ड आहे. गुंतवणूक केल्यास आठ दिवसांत दामदुप्पट असे आमिष दाखविणार्या संकल्पसिद्धीसह शुभ ट्रेड बीज, ग्रोबझ ट्रेडिंग सर्व्हिसेस, सीएनजी बायोगॅस, फिनिक्स निधी लिमिटेड व फिनिक्स ट्रेडिंग लाईव्ह, एनडल्ब्यू रॅफटर यासारख्या 11 कंपन्यांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
स्थानिक गुंड आणि राजकीय आश्रयाने टोळ्यांची शिरजोरी
स्थानिक गुंडांची कुमक आणि राजकीय आश्रयांचा फायदा घेऊन सहा-सात महिन्यांत कोट्यवधीचा धंदा करून रातोरात गाशा गुंडाळून पलायनाचा प्रकार काही नवा नाही, तरीही दामदुपटीच्या आमिषाला बळी पडून शेकडो गुंतवणूकदार तोंडघशी पडत आहेत. बक्कळ कमिशनच्या आमिषाला बळी पडून सरकारी कचेर्यातल्या बड्या अधिकार्यांसह कर्मचार्यांनीही ग्रामीण भागात गुंतवणूकदारांची साखळी निर्माण केली आहे. शासकीय नोकरदारांपासून शिक्षक, शेतकरी, उद्योग, व्यावसायिकांनाही जाळ्यात ओढल्याचे जिल्ह्यात चित्र आहे.
शंकेची पाल चुकचुकली…
तेलही गेलं अन् तुपही..!
मलेशियातील रिका लिम नामक महिलेने कोल्हापूर येथील बेकरी व्यावसायिक उदय (रा. टाकाळा) यांच्याशी संपर्क साधला. सिंगापोर येथील 'केप्पल डायमंड' ही जागतिक दर्जाची शेअर मार्केटिंगची कंपनी असल्याचे ठासून सांगितले. भारत आणि मलेशियासाठी टेक्निकल अॅडव्हायरल म्हणून आपण स्वत: कार्यरत आहे. कंपनीत ऑनलाईन ट्रेडिंग चालते. डायमंड आणि प्लस्टिक कमोडीटीचे शेअर्स व लॉटस् खरेदीचा व्यवहार चालतो. कंपनीमध्ये पैसे गुंतविल्यास भरपूर परताव्याचे आमिष दाखविले. 22 मार्च 2022 ते 7 जून 2022 या काळात व्यावसायिकाने स्वत: व पत्नीच्या जोड खात्यातून रिका लिम हिच्या नावे 20 लाख 2 हजार रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केलेल्या रकमेमध्ये व्यावसायिकाला प्रत्येकवेळा वाढच दिसून येत होती. 25 मे 2022 रोजी त्यांच्या खात्यावर एकूण 40 लाख 44 हजार 300 रुपये जमा असल्याचे दिसून आले.
व्यावसायिकाने रिका लिम हिच्याशी संपर्क साधून मला पैशाची गरज आहे. जमा झालेल्या रकमेपैकी काही पैसे आपण काढणार आहे, असे सांगितले. त्यावर आता पैसे काढले, तर बोनस मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही पैसे काढू नका, असे सुचविण्यात आले. दि. 30 मे 2022 रोजी त्यांनी पुन्हा संबंधित महिलेशी संपर्क साधला व पैशाची मागणी केली; मात्र पुन्हा नकार मिळाला. व्यावसायिकाने 'केप्पल डायमंडस् डॉट कॉम' वेबसाईट ओपन करण्याचा प्रयत्न केला; मात्र सदरची वेबसाईट बंद असल्याची दिसून आली. यावेळी त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आजअखेर ही वेबसाईट व मोबाईल क्रमांक बंद असल्याने व्यावसायिकाने राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फसवणुकीची फिर्याद दाखल केली.
गुंतवणूकदारांची भिकेकंगाल अवस्था
खाऊन- पिऊन सुखी, समृद्ध असलेल्या इचलकरंजी येथील एका 45 वर्षीय शिक्षकाला तीन वर्षांत दामदुपटीच्या कमाईची बुद्धी सुचली. बहुचर्चित कंपनीमध्ये एजंटाच्या मध्यस्थीने त्यांनी प्रथम 16 लाखाची गुंतवणूक केली. पहिल्या टप्प्यात चार महिने त्यांना 60 हजाराचा परतावा मिळाला. पगाराशिवाय पैसे मिळू लागल्याने तोंडाला पाणी सुटले. एजंटाने पुन्हा शिक्षकाला गाठले.त्याचाही विश्वास वाढला.पुन्हा 16 लाखांची गुंतवणूक करण्यास राजी झाले. पत्नीचे दागिने विकले. संस्थेतून कर्ज काढले. गुंतवणूक केली खरी, पण दोन हप्त्यानंतर कंपनीने गाशा गुंडाळला. 65 हजार पगार आणि बँकेचा दरमहा 50 हजारांचा हप्ता…15 हजारांत संसाराचा गाडा हाकताना शिक्षकाची काय अवस्था होत असेल? हा शिक्षक अक्षरश: भिकेकंगाल परिस्थिती अनुभवतो आहे. (पूर्वार्ध)
जिल्ह्यात 900 ते 950 कोटींवर फसगत
दाखल गुन्ह्यांच्या आधारे एकूण 3 कोटी 11 लाख 31 हजार 217 रुपयांची फसवणूक झाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांकडून सांगण्यात आले. तब्बल 53 संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. सरसकट गुंतवणूकदारांनी पोलिस ठाण्यांकडे धाव घेऊन तक्रारी दाखल केल्यास फसवणुकीचा आकडा सुमारे 900 ते 950 कोटींच्या आसपास होईल. पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांपेक्षाही आर्थिक गुन्हे अन्वेषणसह अन्य तपास संस्थांकडील फसवणुकीची रक्कम यापेक्षा किती तरी पटीत असावी, अशीही शंका वरिष्ठ सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
घसघशीत परताव्याच्या आमिषाने 35. 46 लाखांना गंडा
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास 7 दिवसाला 3 टक्के, 14 दिवसाला 7 टक्के, 30 दिवसाला 15 टक्के घसघशीत परताव्याच्या आमिषाने कोलकाता व गोवा येथील साखळीने ताराबाई पार्क येथील मार्केटिंग व्यावसायिकासह 4 गुंतवणूकदारांना 35 लाख 46 हजारांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. टाकाळा परिसरात कार्यालय थाटलेल्या कंपनीने शहर, जिल्ह्यातील शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्यांपैकी 5 जणांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन साखळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साखळीने फिर्यादी सुहास (10 लाख), साक्षीदार श्रीहरी (3 लाख 50 हजार), सागर (8 लाख 45 हजार), अनिल (2 लाख 41 हजार), सत्यजित 10 लाख रुपये याप्रमाणे 5 जणांना एकूण 35 लाख 46 हजारांची टोपी घातली आहे.