

पाचगाव, पुढारी वृत्तसेवा : करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव येथे गॅस्ट्रोसद़ृश आजाराची लागण झाली आहे. या आजाराने 60 जण बाधित झाले आहेत. यातील एका वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. रामचंद्र आवबा जमदाडे (वय 72) असे त्यांचे नाव आहे. बाधित 14 जण आयसोलेशन व सीपीआरमध्ये तर इतर गावातच उपचार घेत आहेत.
प्राथमिक अंदाजानुसार ही साथ दूषित पाण्यामुळे पसरली आहे. ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची गळती कुठे आहे का याचा शोध घेतला. मात्र, कुठेही गळती आढळली नाही. दक्षतेचा उपाय म्हणून उघडे नाले व रस्त्याकडेला औषध फवारणी केली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र इस्पुर्ली, निगवे, नंदगाव येथील वैद्यकीय अधिकार्यांचे पथक गावामध्ये दाखल झाले आहे. वैद्यकीय अधिकारी,
आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत घरोघरी बाधित रुग्णांचा शोध घेऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात आहे. कोणतीही लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत तसेच आरोग्य विभागाने केले आहे.
दाम्पत्य अस्वस्थ
उलट्या-जुलाबमुळे प्रकृती बिघडलेल्या दाम्पत्याला रविवारी सकाळी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदाशिव दिनकर कांबळे (वय 60) व अलका सदाशिव कांबळे (50) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, वेळीच आरोग्यसेवा पुरविल्यामुळे साथ आटोक्यात येऊ लागली आहे, असे सरपंच अनिल मुळीक यांनी सांगितले.