

कोल्हापूर, सचिन टिपकुर्ले : कार्यकारिणीची मान्यता नसल्याने चित्रपट महामंडळाच्या 40 हजार 'अ' वर्ग सभासदांचा मतदानाचा प्रश्न निर्माण झाला आहे. महामंडळाच्या स्थापनेपासून प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात 'अ' वर्ग सभासदांची नोंदणी झाली असून तांत्रिक कारणामुळे या सभासदांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागणार की त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार याकडे सभासदांचे लक्ष लागून आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. महामंडळाच्या 17 जागांसाठी ही निवडणूक सुरू होऊन 3 हजार 403 मतदार मतदानास पात्र ठरले . या अगोदर 6 हजार 255 जणांची अंतिम यादी होती; पण 29 डिसेंबर 2018 पर्यंतचे 3 हजार 403 'अ' वर्ग सभासदांना मतदानास पात्र ठरवत धर्मादाय आयुक्तांनी नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकार्यांना मतदार यादी जाहीर केली. साहजिकच उर्वरीत मतदारांना कार्यकारिणीची मान्यता नसल्याने मतदानापासून वंचित राहावे लागणार होते.
अशाच पद्धतीने राज्यात विविध जिल्ह्यातून 2016 पासून अनेक जणांनी महामंडळाचे 'ब' वर्ग सभासदत्व घेतले. नियमाप्रमाणे 3 वर्षे सभासद वर्गणी भरल्यानंतर ते 'अ' वर्ग सभासद झाले. ही संख्या 40 हजारांहून अधिक असल्याचे बोलले जात आहे. पण कार्यकारिणीची मान्यता नसल्याने या पात्र सभासदांच्या मतदानाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महामंडळाच्या स्थापनेपासून प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात 'ब' वर्ग सभासदांची नोंदणी झाली. या वर्गणीतून महामंडळाकडे कोट्यवधी रुपयांची वर्गणी जमा झाली. संपूर्ण महाराष्ट्रात आज 55 हजार सभासद झाले आहेत. यापैकी 40 हजारांहून अधिक 'अ' वर्ग सभासद झाले असल्याचे बोलले जात आहे. उच्च न्यायालयाने सध्या धर्मादाय आयुक्त कार्यालयाने राबवलेल्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.
कार्यकारिणीस मान्यता नसणे हाच कळीचा मुद्दा
महामंडळाच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दोन वर्षे ही कोरोनात गेली. उर्वरित काळ हा आपापसातील वादात गेला. जेव्हा कार्यकारिणी बैठका झाल्या, त्यातही आरोप-प्रत्यारोपच झाले. ज्या सभासदांनी पैसे भरले ते आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, अशी मागणी करत आहेत. पण कार्यकारिणीत या 'ब' वर्ग सभासदांना 'अ' वर्ग सभासद म्हणून मान्यता देण्यात आली नाही. या तांत्रिक मुद्यावरून हे सभासद मतदानापासून वंचित राहणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. तर महामंडळाच्या घटनेप्रमाणेच निवडणूक प्रक्रिया राबवली पाहिजे, अशी भूमिका सभासदांची असल्याचे आजीव सभासद सदाशिव पाटील यांनी सांगितले.