आयुष्याच्या उत्तरार्धात रस्त्यावरच त्यांनी मांडला संसार नवा

आयुष्याच्या उत्तरार्धात रस्त्यावरच त्यांनी मांडला संसार नवा

Published on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  तोंडात दात नाहीत, हाडं खिळखिळी झालेली, चेहर्‍यावरील सुरकत्यांमधून येणार्‍या घामाच्या धारा, काहीशा मळकटलेल्या कपड्यांत कोणी सिग्नलवर पेन विकतं, तर कोणी विस्तवातील भात्यांमधून हत्यारं घडवतं, तर कुठे साडीच्या झोपडीत दिवसभर भीक मागून मिळवलेल्या पैशात जगण्याचा हिशेब लावत बसते. आयुष्याच्या उत्तरार्धात रस्त्यावर त्यांनी मांडलेला नवा संसार बघून कोणालाही त्यांच्या संघर्षाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.

पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्याच्या अंतिम टप्प्यातही त्यांचा जीवनसंघर्ष कायम आहे. शहरातील एका सिग्नलवर वृद्ध दाम्पत्य भीक न मागता पेन विकून त्यामधून पैसे मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते; तर दुसरीकडे वाशी नाका परिसरात घरगुती आणि शेतीच्या वापरातील हत्यारे धगधगत्या आगीसमोर लोखंडाचे घाव घालून तयार करते; तर कोणी महापुरुषांच्या मूर्तींना आकार देत कुटुंबाचा गाडा चालवतो आहे. शहराच्या वेशीवर एक वृद्ध जोडपे मिळेल ते काम करून पै पै गाठीशी बांधण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते. त्यांच्या उद्याचा भरवसा नसला, तरी आपल्या साथीदारांसाठी त्यांची तळमळ मनाला छेदणारी आहे.

तीन दगडांची चूल मांडून त्यावर अन्न शिजवून पोटाची आग शमवण्यासाठी त्यांची रोजचीच धडपड असते. उन्हातान्हात बायको भाकरी करताना घामाने भरलेला तिचा चेहरा पुसताना त्यांच्यातील जिव्हाळा द़ृष्ट लागण्यासारखा वाटतो. कोणावर परिस्थितीने, तर कोणाला मुला-बाळांनी दूर लोटल्यामुळे त्यांच्या नशिबी असले जगणे आले आहे. सर्व सुविधा असूनही त्यामागे धावणारा मध्यमवर्गीय, प्रतिष्ठित नागरिक; तर कफल्लक असूनही कुरबुर न करता जगणारा झोपडीतील माणूस यांच्यात श्रीमंत कोण, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

कोणी निवारा केंद्रात, तर कोणी वृद्धाश्रमात राहण्याचा सल्ला दिला. मात्र, तरीही आयुष्याच्या अखेरच्या दिवसांत इतक्या वर्षांची सोबत तुटण्याच्या भीतीने ते जाण्याचे टाळतात. जन्माला घातलेल्या मुलांच्या जीवावर राहिलो नाही, तर आता फुकटचं खाऊन मरण तरी कसे येईल. जीवात जीव असेपर्यंत स्वतःच्या जीवावर कमवून मीठ-भाकरी खाऊ… स्वाभिमानाने जगू, असे मत त्यांनी व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news