कोल्हापूर : तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात !

कोल्हापूर : तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात !
Published on
Updated on

कोल्हापूर, दिलीप भिसे : शहर, जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी धोकादायक वळणावर आहे. त्यात 17 ते 25 वयोगटातील आणि ऐन उमेदीतील तरुणांचा सक्रिय सहभाग सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारा आहे. विनासायास कमाईला सोकावलेल्या सराईत टोळ्यांकडून तरण्याबांड पोरांना प्रशिक्षित करून गुन्हेगारीच्या मायाजालात ओढण्याचा उद्योगच बनला आहे. काळ्या धंद्यांसह अंमली पदार्थ, गुटख्यांसह दारू तस्करीतील कारनाम्यांमुळे तरुणाईची फरफट होऊ लागली आहे. वाढत्या व्यसनामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त होऊ लागली आहेत.

शिंगणापूर येथील 24 वर्षीय ऋषीकेश सूर्यवंशी याचा मारेकर्‍यांनी थंड डोक्याने कट रचून अत्यंत क्रूरपणे खून केला. हाता- तोंडाला आलेल्या एकुलत्या मुलाचा सराईत गुन्हेगारी टोळीने बळी घेतल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे. खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी बेड्या ठोकलेले चारही संशयित मारेकरी 20 ते 22 वयोगटातील आहेत.

'भाईगिरी'साठी दहशत!

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळीचा म्होरक्या गणेश यलगट्टी, ऋषभ साळोखे हे चारही सराईत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील असले तरी फुकटात जगणार्‍या चैनीखोर वृत्तीमुळे त्यांचा गुन्हेगारी वतुर्ळात आपसूक शिरकाव झाला. गुन्हेगारी क्षेत्रातील दबदबा, वर्चस्व आणि 'भाईगिरी'मुळे त्याची गुंडागर्दी वाढू लागली आहे. गणेश यलगट्टीसारख्या आज अनेक समाजकंटकांची गल्ली बोळात, वाड्या-वस्त्यावर दहशत वाढू लागली आहे. पिस्टल, चाकू, तलवारीसह जीवघेणी शस्त्रे जणू त्यांची खेळणीच बनली आहेत.

गंभीर गुन्ह्यात वाढता सहभाग

खून, अपहरण, गुंडागर्दी, खंडणी वसुली, ठकबाजी, दुचाकी चोरीसह फसवणुकीच्या गुन्ह्यात कोवळ्या वयोगटातील मुलांचा सहभाग धक्कादायक आणि सामाजिकदृष्ट्या चिंता वाढविणारा आहे. झटपट कमाई करून देणार्‍या मोबाईल, वाहन चोरीच्या गुन्ह्यात वर्षभरात जेरबंद झालेल्यामध्ये बाल संशयितांचे प्रमाणही सर्वाधिक आहे. हा वाढता टक्का भविष्यात घातक ठरणारा आहे.

जुगारातही गुरफटले

विनासायास कमाईला सोकावलेल्या टोळ्यांकडून 17 ते 25 वयोगटातील तरुणांचा वापर केला जात आहे. भरपूर कमिशन, मनसोक्त पार्ट्या, व्यसनाधीनतेमुळे दिवसेंदिवस हे प्रमाण वाढू लागले आहे. जुगारी अड्ड्यांवरही कोवळ्या मुलांचाही होणारा वापर डोके सुन्न करणार्‍या आहेत.

मोका, तडीपारीतही वाढता टक्का!

2021 व 2022 या वर्षात जिल्ह्यात खुनाच्या अनुक्रमे 50 व 51 घटना घडल्या. सरासरी 90 ते 94 टक्के गुन्ह्यांची उकल झाली. बेड्या ठोकलेल्या संशयितात 20 ते 25 वयोगटातील संशयित तरुणांंचे 45 ते 50 टक्क्यांवर प्रमाण आहे. मोकाअंतर्गत तसेच तडीपार झालेल्यात मिसरूडही न फुटलेल्या तरुणांची संख्या लक्ष वेधणारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news