कोल्हापूर : टाचा घासल्या तरी प्रकल्पग्रस्तांचे काम होणार नाही, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उद्विग्न

कोल्हापूर : टाचा घासल्या तरी प्रकल्पग्रस्तांचे काम होणार नाही, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उद्विग्न
Published on
Updated on

कोल्हापूर: पुढारी वृत्तसेवा

अधिकार्‍यांच्या नकारात्मक भूमिकेनेच प्रकल्प रेंगाळत आहेत, टाचा घासल्या तरी प्रकल्पग्रस्तांची कामे होणार नाहीत, अशी उद्विग्नता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी व्यक्त केली. यापूर्वीचे आणि सध्याचे जिल्हाधिकारी आहेत म्हणून प्रकल्पग्रस्तांना थोडा तरी न्याय मिळत आहे, असेही सांगत आंबेओहोळप्रश्नी मंत्रालयात येत्या 15 दिवसांत बैठक आयोजित करू असे त्यांनी सांगितले.

आंबेओहोळ प्रकल्पातील करपेवाडी येथील प्रकल्पग्रस्तांच्या स्वेच्छा पुनर्वसन आणि अन्य प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत स्वेच्छा पुनर्वसनाच्या आर्थिक पॅकेज वाढवून देण्याबाबत प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या मागणीवर काथ्याकूट करण्यात आला. याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रश्नांवर 24 वर्षे हजारो बैठका घेतल्या, तरीही आमचे रक्त का खवळत नाही, हेच कळत नाही. असे सांगत जे धोरणात्मक आहे, त्याबाबत लवकर निर्णय व्हायला पाहिजे. प्रकल्पग्रस्तांना अधिकारी खिशातून काही देत नाहीत, यामुळे छोट्या छोट्या खुसपटी का काढता? तुम्ही तळमळ दाखवली तर प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न सुटतील, असेही त्यांनी सांगितले.

प्रकल्पग्रस्त सखाराम कदम, मच्छिंद्र कडगावकर, बबन पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने बाजू मांडली. विळा आणि भोपळा तुमच्याच हाती आहे, तुम्हीच काय ते ठरवा. कायदा आणि माणुसकीचा विचार करून निर्णय घ्या, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी रेखावार यांनी मंगळवारी सायंकाळपर्यंत 50 हेक्टर जमीन वाटपाचे आदेश दिले जातील, असे सांगितले. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, भूसंपादन अधिकारी शक्ती कदम, आजरा-भुदरगडच्या प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, गडहिंग्लज-चंदगडचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमारे, आजर्‍याचे तहसीलदार विकास आहीर उपस्थित होते.

आम्ही नाही… नाही…, तुम्ही व्हय… व्हय… म्हणायला हवे

राज्याची निर्मिती झाली तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी अधिकार्‍यांची कार्यशाळा घेतली होती. लोकांना न्याय देण्यासाठी आता राजकीय नेत्यांनी नाही नाही आणि अधिकार्‍यांनी होय होय म्हणायला पाहिजे, असे सांगितले होते. त्यांचा हा संदेश अद्याप अधिकार्‍यांपर्यंत पोहोचला नाही. आम्ही अजून व्हय व्हय, आणि अधिकारी नाही नाही म्हणत असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news