कोल्हापूर : जोतिबावर देवतांची वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे

कोल्हापूर : जोतिबावर देवतांची वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे
Published on
Updated on

कोल्हापूर ; सागर यादव : दख्खनचा राजा जोतिबा डोंगरावर जोतिबा देवासह काळभैरव, यमाईदेवी, चोपडाईदेवी अशा अनेक सहदेवतांची वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत. विविध धार्मिक तीर्थे आहेत. जोतिबाच्या दर्शनासाठी येणारे भाविक आवर्जून या देवदेवतांचे दर्शन घेतात. किंबहुना या देवतांच्या दर्शनाशिवाय जोतिबा यात्रा पूर्णच होत नाही.

जोतिबाचा सेनापती काळभैरव

जोतिबाचा नारळ आशीर्वाद म्हणून काळभैरवाच्या चरणी फोडल्याशिवाय प्रत्येक भक्‍ताची जोतिबाची यात्रा पूर्णच होत नाही. दख्खनच्या मोहिमेत काळभैरवाने जोतिबास भावासारखी साथ दिली. त्यामुळे जोतिबाचा सेनापती व करवीर क्षेत्राचा क्षेत्रपाल म्हणून त्याला मान आहे. काळभैरव हा शंकराचा अंश आहे. श्री काळभैरव हा चतुर्भुज आहे. एका हातात खङग (तलवार), दुसर्‍या हातात डमरू, तिसर्‍या हातात त्रिशूळ तर चौथ्या हातात पात्र आहे. त्याने व्याघ्रचर्म पांघरलेले आहे. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा धारण केलेल्या आहे. कंठामध्ये नागभूषण आहेत. जोतिबा डोंगरावरील गुरव व डवरी लोक श्री जोतिबाच्या प्रत्येक देवकार्यात श्री काळभैरवाचा महिमा आवर्जून गातात.

आदिमाया श्री चोपडाईदेवी

जोतिबाच्या दक्षिण मोहिमेत इतर देवतांबरोबरच श्री चोपडाईदेवीची मोलाची मदत झाली. यामुळे जोतिबा डोंगरावर मूळमाया श्री चोपडाईदेवीचे स्थान महत्त्वाचे आहे. चोपडाईदेवीला श्री जोतिबादेवाची आई असेही संबोधले जाते. श्रावण षष्टीला येणारा प्रत्येक भक्‍त लिंबू व नारळ इथून घरी नेत असतो. श्रावण षष्टीच्या यात्रेला चोपडाईदेवीची यात्रा असे म्हटले जाते. यात्रेदिवशी देवीची दूर्वा, लिंब, शमी आणि संत्र्यांचा थंडावा देणारी वैशिष्ट्यपूर्ण पूजा बांधली जाते. चोपडाईचे मंदिर पश्‍चिमाभिमुख असून, याही मंदिरात वर्षातून दोनवेळा किरणोत्सव पार पडतो.

यमाईदेवी

जोतिबाने चोपडाईदेवी, अंबाबाई व यमाईदेवी यांच्या मदतीने दक्षिणेतील कोल्हासुर, रत्नासुर व महिषासुर या राक्षसांचा नाश केला. दक्षिण मोहिमेवरील राक्षसांना कंठस्नान घालण्यासाठी श्री जोतिबा देवाला अनेक देवदेवतांना बोलवावे लागले. जोतिबाने मूळमाया यमाईदेवीला
'ये माई' असे म्हटले म्हणून तिला 'यमाई' म्हणतात. यमाईदेवीच्या प्रमुख सहाय्याने जोतिबा देवाने दक्षिण मोहीम फत्ते केली. जोतिबा-अंबाबाई व त्याच्या भैरव, नाथ व शक्‍तिसेनेने मणिभद्र व मलभद्र या असुरांचा नायनाट केला. यानंतर अवंदासुराशी दिवसरात्र घनघोर युद्ध सुरू होते. विश्रांतीची गरज असल्याने जोतिबाने यमाई देवीचा धावा केला. मूळ नक्षत्रावर सर्व राक्षसांचा व अवंदासुर राक्षसाचा यमाईदेवीने वध केला.

कल्‍लोळतीर्थ तथा जमदग्‍नीतीर्थ

जोतिबा डोंगरावरील चाफेवनातील यमाई मंदिराच्या समोर कल्‍लोळतीर्थ अर्थात जमदग्नीतीर्थ आहे. यमाई मंदिरातील जमदग्नीच्या मूर्तीखालूनच या तीर्थातील पाण्याचा उगम आहे. हे तीर्थ अत्यंत औषधी असून, गंधकयुक्‍त आहे. त्यामुळे यात स्नान करणार्‍या भाविकांचे त्वचेचे विकार बरे होतात, अशी श्रद्धा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news