

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जोतिबा मंदिराच्या शिखरांची गळती काढण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यानंतर हे काम सुरू केले जाईल. पहिल्या टप्प्यात वॉटरप्रूफिंगचे काम करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
देवस्थान समिती, केंद्रीय पुरातत्त्व विभाग आणि महसूल प्रशासनाची जोतिबा मंदिर येथे बैठक झाली. पुण्याच्या डेक्कन कॉलेजकडून जोतिबा मंदिराचा स्ट्रक्चरल सर्व्हे करण्यात आला आहे. मंदिराच्या शिखरांची गळती काढण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे.
जोतिबा यात्रेनंतर गळती काढली जाईल. प्रस्तावित जोतिबा प्राधिकरणाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराचा सर्व्हे करून त्याचा अहवाल 25 जानेवारीपर्यंत येईल.
केंद्रीय पुरातत्त्व व्यवस्थापक सिंग, सचिन पाटील, देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे, पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे, डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाचे डॉ. साबळे, सुदेश पाटील उपस्थित होते.