कोल्हापूर जिल्हा बँक बिनविरोध निवडीच्या हालचाली वेगावणार

कोल्हापूर जिल्हा बँक बिनविरोध निवडीच्या हालचाली वेगावणार
Published on
Updated on

गोकुळ दूध संघाच्या आडाने कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता विधान परिषदेच्या संदर्भाने बँकेचा तिढा सोडविण्यासाठी हालचाली वेगावणार आहेत. भाजपसह महाडिक गट, आ. विनय कोरे आणि आ. प्रकाश आवाडे यांना सोबत घेऊन जिल्हा बँकेत समझोता एक्स्प्रेस धावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विधान परिषदेच्या राजकारणाचे प्रतिध्वनी जिल्हा बँकेत उमटतील काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

पालकमंत्री सतेज पाटील यांचे गगनबावडा तालुक्यातून कोल्हापूर जिल्हा बँक मधील प्रवेशावर शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याचे बोलले जाते. कागलमधून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि करवीर तालुक्यातून आ. पी.एन. पाटील यांचा विजय निश्चित मानला जातो. शिरोळ तालुक्यात राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना सर्वपक्षीयांनी घेरले असून गणपतराव पाटील यांच्या रूपाने विधान परिषदेचे राजकारण उमटू शकते. मार्केटिंग अँड प्रोसिसिंग गटातून शिवसेना खा. संजय मंडलिक यांना सत्तारूढकडे दुसरा पर्यायच नाही. शिवसेनेकडून माजी खासदार निवेदिता माने, आ. प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांना प्रत्येकी एक अशा चार जागेवर समाधान मानावे लागेल.

जनसुराज्य पक्षाचे आ. विनय कोरे यांनी बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना विरोध करत तीन जागांची मागणी केली होती. हातकणंगले तालुक्यातून महादेवराव महाडिक यांचे पारडे जड आहे. आवाडे गटाची संस्थात्मक ताकद नाकारून चालणार नाही. चंदगडमधून राजेश पाटील, गडहिंग्लजमधून संतोष पाटील आणि आजर्‍यातून अशोक चराटी या विद्यमान संचालकांनी प्रचार सुरू केला आहे. के. पी. पाटील आणि ए. वाय.पाटील पुन्हा भुदरगड आणि राधानगरीतून दावेदार मानले जातात. शाहूवाडी तालुक्यात सर्जेराव पाटील-पेरीडकर आणि मानसिंग गायकवाड यांच्यातील तिढा सोडवताना नेत्यांची कसरत होणार आहे.

महिला गटातून दुसरी जागा उदयानी साळुंखे आणि अनु. जाती-जमाती गटातून आ. राजू आवळे या दोन जागांसाठी काँग्रेस आग्रही राहील. वाढत्या दावेदारांमुळे बिनविरोधसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना तडजोडीची कसरत करावी लागणार आहे.

राजकारण कूस बदलणार ( कोल्हापूर जिल्हा बँक )

हातकणंगलेतून महाडिक गट, आवाडे गटासाठी एक जागा, विनय कोरे यांच्यासह अजून दोन जागांवर तडजोड अशा भाजप आघाडी म्हणून पाच जागा देऊन सर्वपक्षीय समझोत्याने जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. सांगली आणि सातारा मध्यवर्ती बँकेचा अनुभव आणि विधान परिषद निवडणुकीची बदललेली राजकीय कूस पाहता, जिल्हा बँकेत भाजपचा बिनविरोधाचा मूड कायम राहील. तर बँक सहज पुन्हा ताब्यात राहावी, यासाठी राष्ट्रवादी किती जागांवर तडजोड करणार? हा मुद्दाही महत्त्वाचा ठरेल.

तर सर्वांनाच करावी लागणार तडतोड

राष्ट्रवादीला आठपैकी किमान दोन जागांवर तडजोड करावी लागेल. काँग्रेसला सहापैकी एक जागा सोडावी लागेल. शिवसेना चार जागांवर आग्रही असली तरी तडजोडीच्या राजकारणात 'मातोश्री'चा आदेश महत्त्वाचा राहील. आ. विनय कोरे यांची मनधरणी आणि मागणी पूर्ण करताना महाविकासच्या नेत्यांची दमछाक होईल. भाजपची आता सहा जागांची मागणी असली तरी आघाडीत विभागणी करून मनधरणी केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news