

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा तिसर्या टप्प्यात. जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या आत आल्याने कोल्हापूर जिल्हा आता तिसर्या टप्प्यात आला आहे.
त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील जीवनावश्यक सेवेच्या दुकानांबरोबरच अन्य सर्व दुकानेही सुरू करण्यास परवानगी देऊ, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिल्याचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी सांगितले. त्यामुळे सोमवारपासून सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनप्रमुख जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी याबाबत रात्री उशिरापर्यंत आदेश काढले नव्हते. शनिवारी याबाबतचे आदेश काढले जाणार आहेत.
कोल्हापूर ः केंद्रीय आरोेग्य समितीने कोल्हापूरची कोरोना स्थिती गंभीर नसल्याचा निर्वाळा गुरुवारी वैद्यकीय आढावा घेऊन दिला आहे. त्याच्याशी मी सहमत नाही, कोल्हापूर जिल्ह्याची कोरोना परिस्थिती गंभीर नाही, असे मी कधीही म्हणणार नाही. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 9.7 आहे. तो आणखी कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत व्यक्त केले.
ते म्हणाले, एकसुद्धा मृत्यूहोणे गंभीर आहे. जी परिस्थिती सध्या आहे, त्यामध्ये सुधारणा करायची आहे. त्यासाठी ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंगसह लसीकरणावर भर द्या, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. पॉझिटिव्हिटी रेट अधिक असल्याने जिल्ह्यातील व्यापार सुरू करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन घेईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यातच जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वाधिक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री टोपे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.
मंत्री टोपे म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाने 'हाय रिस्क' आणि 'लो रिस्क' रुग्णांच्या तपासावर प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. 15 जून रोजी आम्ही जिल्ह्याच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला होता. त्याची प्रशासनाने दखल घेऊन टेस्टिंग, ट्रॅकिंगवर भर देत गत आठवडाभरात 86 हजार जणांची तपासणी केली आहे. पॉझिटिव्हिटी रेट 15.6 वरून 9.7 टक्क्यांवर आला आहे
जिल्हा चौथ्या टप्प्यावरून तिसर्या टप्प्याकडे येतोय, पॉझिटिव्हिटी रेट जुलैअखेरपर्यंत आणखी कमी होईल, असा विश्वास व्यक्त करून टोपे म्हणाले, आठवड्याचा मृत्यू दर 3.4 वरून 1.3 टक्के असा खाली आला आहे. होम आयसोलेशन रुग्णांची टक्केवारी 48 होती, ती आता 28 टक्क्यांवर आली आहे. होम आयसोलेशन उपचार घेणार्या रुग्णांशी वैद्यकीय पथकाने समन्वय ठेवला पाहिजे. त्या रुग्णांच्या प्रकृतीबाबत दररोज माहिती घेतली पाहिजे. लक्षणे गंभीर होत असतील तर त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले पाहिजे. त्यामुळे मृत्यू दर कमी करण्यास मदत होईल.
मंत्री टोपे म्हणाले, जिल्ह्याला पहिल्या लाटेपेक्षा दुसर्या लाटेचा फटका अधिक बसला आहे. जिल्ह्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात नद्यांना पूर येतो. त्यामुळे नदीकाठावरील 171 पूरग्रस्त गावांतील नागरिकांचे लसीकरण प्राधान्याने करण्याची सूचना दिली आहे. विशेष म्हणजे, राज्यात कोल्हापूर जिल्ह्याने सर्वाधिक लसीकरण केले आहे, ही समाधानाची बाब आहे. तरीदेखील ज्या तालुक्यांत, गावांत पॉझिटिव्ह रुग्णसंख्या अधिक आहे, तेथे लसीकरणावर अधिक भर दिला पाहिजे.