

शिरोली पुलाची ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरानजीक पुलाची शिरोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेची वाहनातच प्रसूती झाली. दवाखान्यात डॉक्टर, नर्स कोणीच नसल्याने वाहनातच प्रसूतीच्या कळा सोसत तिची प्रसूती झाली. यामध्ये अर्भकाचा दुर्दैवी अंत झाला. डॉक्टर व नर्सच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी नातेवाईकांनी दवाखान्याच्या दारातच धरणे धरले. हा प्रकार बुधवारी सकाळी 9.30 च्या सुमारास घडला.
शिरोली शास्त्रीनगर येथील महिला प्रसूतीसाठी कुटुंबासमवेत खासगी वाहनातून आरोग्य केंद्रात आली. प्रसूतीकळा सुरू झाल्याने ती टाहो फोडत होती. आरोग्य केंद्रात डॉक्टर व नर्स नसल्याने उपचाराअभावी तिला कळा असह्य झाल्या व वाहनातच तिची प्रसूती झाली.
या प्रकाराची माहिती सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव यांना निलेश शिंदे व पवन कांबळे यांनी दिल्यानंतर खवरे यांनी आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. त्यावेळी तेथे उपस्थित डॉ. जेसिका अँड्र्यूज व परिचारिकांना धारेवर धरून जाब विचारला. या घटनेस आपण जबाबदार असल्याचे सांगितले.
शशिकांत खवरे व पीडित कुटुंबासह कार्यकर्त्यांनी दवाखान्याच्या पायरीवरच ठिय्या आंदोलन करून निषेधाच्या घोषणा दिल्या. दोषींवर कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली. डॉ. जेसिका अँड्र्यूज यांनी दोषी कर्मचार्यांवर कारवाईचे आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.
जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शौमिका महाडिक व पंचायत समिती सभापती डॉ. सोनाली पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यांनी हलगर्जीपणा केलेल्या डॉक्टर व नर्सेसना निलंबित करावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकार्यांकडे करणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण, ग्रा. पं. सदस्य सरदार मुल्ला, ज्योतिराम पोर्लेकर, संदीप कांबळे, योगेश चव्हाण, महेश गावडे, अर्जुन चौगले, पवन कांबळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.