

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गुंतवणुकीवर दरमहा आठ टक्के बोनस आणि दीड वर्षानंतर मूळ रक्कम परत देण्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांना एक कोटी 76 लाख रु.चा गंडा घालून पसार झालेल्या राजारामपुरी येथील ऑक्ट नाईन इन्व्हेस्टमेंट सोल्युशन कंपनीचा म्होरक्या अभिजित जोती नागावकर (वय 35, रा. अयोध्या पार्क, कोल्हापूर) याला शुक्रवारी सांगलीत अटक करण्यात आली. त्याच्याकडून मोटारीसह तीन लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणातील अन्य दोन संशयित कृष्णात नंदा चौगुले (तस्ते गल्ली, मंगळवार पेठ), नामदेव विठ्ठल माळी (मणेर मळा उचगाव, ता. करवीर) या फरारींच्या शोधासाठी राजारामपुरी पोलिसांची दोन पथके कर्नाटकात रवाना झाली आहेत. संशयितांचा लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले.
गुंतवणूकदारांनी तक्रारीसाठी पुढे यावे : ओमासे
प्राथमिक चौकशीत संशयितांनी शहरासह जिल्ह्यातील 60 पेक्षा अधिक गुंतवणूकदारांची 1 कोटी 76 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रत्यक्षात फसगत झालेल्या गुंतवणूकदारांसह फसवणुकीच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. फसगत झालेल्या गुंतवणूकदारांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहनही ओमासे यांनी केले आहे.
कर्नाटकातही शोधमोहीम
बांधकाम व्यावसायिक सचिन दत्तात्रय बारड (आयसोलेशन हॉस्पिटल रोड, कोल्हापूर) यांच्यासह 60 गुंतवणूकदारांनी म्होरक्या अभिजित नागावकरसह तिघांविरुद्ध शनिवारी (दि. 26) राजारामपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. संशयितांच्या अटकेसाठी राजारामपुरी पोलिसांनी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्यासह कर्नाटकातही शोधमोहीम राबविली. मात्र संशयित हाताला लागले नव्हते.
म्होरक्याला विश्रामबाग परिसरात घेतले ताब्यात
संशयित नागावकर सांगलीतील विश्रामबाग परिसरात संशयास्पद स्थितीत वावरत असताना विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, सहायक निरीक्षक अमितकुमार पाटीलसह पथकाने त्यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याच्याविरुद्ध राजारापुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून फरारी असल्याची माहिती निष्पन्न झाली. सायंकाळी त्यास राजारामपुरी पोलिसांच्या हवाली करण्यात आले. नागावकरला उद्या, शनिवारी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात येणार आहे, असेही ओमासे यांनी सांगितले.
म्होरक्याचे अपहरण केल्याची वडिलांची तक्रार
मुख्य संशयित नागावकर याच्या वडिलांनी दोन दिवसांपूर्वी पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांची भेट घेऊन आपल्या मुलाचे निपाणी परिसरातून अज्ञातांनी अपहरण केल्याची कैफियत मांडली होती. ओमासे यांनी यासंदर्भात कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधून घटनेची खातरजमा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात तथ्य आढळले नसल्याचेही ओमासे यांची सांगितले.
कार्यालयाला ठोकले टाळे
राजारामपुरी येथील सरूडकर फ्लॅटमध्ये कार्यालय थाटून संशयितांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. जानेवारी 2021 ते 15 नोव्हेंबर 2022 काळात हा प्रकार घडला आहे. संशयितांच्या आमिषाला बळी पडून शहरातील उद्योग व्यावसायिकांसह मध्यमवर्गीयांनी कंपनीकडे लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. मुदतीनंतर बोनससह मूळ रक्कम मिळण्यासाठी गुंतवणूकदारांचा तगादा वाढल्यानंतर कार्यालयाला टाळे ठोकून संशयितांनी पळ काढला आहे.