

कोल्हापूर : सहकारी मित्रांच्या चिथावणीने 13 वर्षीय मुलाने आईने घरातील भिंतीमधील चोरकप्प्यात ठेवलेल्या साडेपाच लाख रुपये किमतीच्या 18 तोळे दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार लक्ष्मीपुरी पोलिसांच्या चौकशीत गुरुवारी उघड झाला. मुख्य संशयित सुदेश सुनील निकम (वय 21, रा. राजाराम चौक, टिंबर मार्केट) याला अटक करून पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
कोल्हापूर मधील उत्तरेश्वर पेठ परिसरात 4 ते 26 नोव्हेंबर दरम्यान ही घटना घडली. संशयिताच्या बहिणीने मंगळवारी लक्ष्मीपुरी ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केल्यावर पोलिसांनी चौकशी सुरू केली. अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेऊन प्रश्नांचा भडीमार करताच गुन्ह्याची कबुली देत अन्य दोन सहकार्यांचीही नावे त्याने सांगून टाकली.
पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, फिर्यादी युवतीचा 13 वर्षीय सख्खा भाऊ तसेच टिंबर मार्केट येथील एक अल्पवयीन मुलगा व सुदेश निकम हे एकमेकांचे जिवलग मित्र आहेत. आईने स्वत:चे सोन्याचे दागिने घरात भिंतीमधील चोरकप्प्यात लपवून ठेवल्याची माहिती मुलाने साथीदारांना दिली होती. त्यांनी मुलाला चिथावणी देऊन चोरकप्प्यातील दागिने काढून घेऊन ये, असे सांगितले. या चिथावणीमुळे मुलाने स्वत:च्या घरात साडेपाच लाख किमतीच्या दागिन्यांची चोरी केली.
मंगळवारी सायंकाळी मुलाच्या आईने दागिन्यांची पाहणी केली. मात्र चोरकप्प्यात दागिने नसल्याचे आढळून आले. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली. भिंतीमधील चोरकप्प्यात ठेवलेल्या दागिन्यांची चोरी झाल्याने पोलिसांचाही संशय बळावला. याच घरातील अल्पवयीन मुलाकडेही पोलिसांनी चौकशी केली.
मुलगा भेदरलेल्या अवस्थेत उत्तरे देऊ लागल्याने चौकशीची गती वाढविण्यात आली. मुलाने प्रश्नांच्या सरबत्तीसमोर नांगी टाकत गुन्ह्याची कबुली दिली. 17 वर्षीय साथीदारासह सुदेश निकम अशा दोघांची नावे पोलिसांना सांगिती. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले आहे. सुदेश निकमला न्यायालयाने 5 दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.