

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील (Kolhapur-north Election) पोटनिवडणुकीतील वातावरण आता चांगलेच तापू लागले आहेत. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे. छोट्या-छोट्या गटाच्या बैठका होऊ लागल्या आहेत. सोमवारी 'दक्षिण'मधील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत 'उत्तर'ला बळ देण्याचे ठरविण्यात आले.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील (Kolhapur-north Election) पोटनिवडणुकीतील चित्र स्पष्ट झाले आहे. या जागेसाठी काँग्रेस व शिवसेना यांच्यात चढाओढ सुरू होती. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा म्हणून आग्रही होते. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेसला सोडण्याची घोषणा केली. त्यामुळे शिवसेनेतील बंडाचे वातावरणही थंड झाले.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे जाळे आता चांगले निर्माण केले आहे. दुसर्या फळीतील कार्यकर्ते या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उत्साहाने कामाला लागले आहेत. सोमवारी सकाळी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलाविण्यात आले होते.
यासाठी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ. ऋतुराज पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व आहे. पालकमंत्री सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मतदारसंघात आहेत.
सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने सूक्ष्म नियोजन केले होते, त्याच प्रमाणे आता कोल्हापूर उत्तरमध्ये नियोजन करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार एका वॉर्डसाठी एका प्रमुख कार्यकर्त्याची निवड करण्यात येणार आहे. त्याच्या मदतीसाठी आवश्यकतेप्रमाणे कार्यकर्ते त्या भागात देण्यात येतील. ज्या ठिकाणी अडचण असेल, त्याठिकाणी स्थानिक परिस्थिती पाहून पालकमंत्री सतेज पाटील स्वत: लक्ष घालतील, असे सांगण्यात आले. ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची असल्यामुळे 'उत्तर'च्या विजयासाठी संपूर्ण 'दक्षिण'ची कुमक आता सज्ज झाली आहे.