

कोल्हापूर, गौरव डोंगरे : दररोज एक टक्का परतावा मिळत असल्याचे भासवत गुंतवणूकदारांच्या रकमा अव्वाच्या सव्वा वाढविण्यात आल्या. मार्च ते ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रत्येकाच्या खात्यातील नफा कित्येक पटीने वाढला खरा; मात्र याचवेळी कंपनीच्या नूतनीकरणाचा बहाणा करून गुंतवणुकीचे पैसे काढण्याचे थांबविले. सप्टेंबरमध्ये ऑनलाईन व्यवहार, तर ऑक्टोबर 2022 पासून कंपनीचे म्होरकेच गायब झाले.
डॉक्सी कॉईन कंपनीची नोंदणी अमेरिका, नायजेरिया, युरोप अशा ठिकाणी दाखविण्यात आली होती. कंपनीचा ग्लोबल को-ऑर्डिनेटर अॅलेक्झांडर डेंझल हा सेमिनारमध्ये ऑनलाईन मार्गदर्शन करायचा. त्याखालोखाल पश्चिम बंगालमधील डॉक्सी कंपनीचा मालक स्वरूप दत्ता, हरियाणाचे सुरेंद्र अंतिल, राजेश कपूर हे या सेमिनारमध्ये डॉक्सी कॉईनच्या वाढत्या किमतीचा आढावा घ्यायचे. या सर्वांनी दिलेले स्वत:चे पत्ते व नावेही बोगस आहेत काय, याचा तपास पोलिस करीत आहेत.
शेअर बाजारातील मातब्बरही भुलले
गांधीनगर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी करीत आहेत. यामध्ये 35 गुंतवणूकदारांची 70 लाखांची रक्कम अडकल्याची नोंद होती. तक्रारदारांची संख्या आता वाढत असून फसवणुकीची रक्कम 74 लाखांवर गेली आहे. शेअर बाजारात अनेक वर्षांपासून ट्रेडिंग करणारे मातब्बरही 'डॉक्सी'च्या मायाजालात अडकल्याचे समोर आले आहे.
नूतनीकरणाचा फंडा
'डॉक्सी'च्या वरिष्ठांनी कंपनीचे नूतनीकरण करण्यात येणार असून यानंतर डॉक्सी कॉईनची किंमत चौपट होईल, असे सांगितले. यामुळे अनेकांनी ऑगस्ट महिन्यात पुन्हा मोठी गुंतवणूक कंपनीकडे केली. मोठी रक्कम डॉक्सी कंपनीकडे येताच हे सॉफ्टवेअर अचानक बंद करण्यात आले. काही दिवसांनी पॉलिगॉन मॅटिक या ब्लॉकचेनवर हे सॉफ्टवेअर पुन्हा सुरू करण्यात आले होते; पण यावेळी पैसे काढण्यात गुंतवणूकदारांना अडचणी आल्या.
ऑक्टोबर महिन्यात विड्रॉल करणे बंद झाले, तर डिसेंबर महिन्यापासून एजंट, प्रमोटरही बेपत्ता झाल्याने गुंतवणूकादारांचे धाबे दणाणले. जानेवारीपासून हे गुंतवणूकदार पोलिस ठाण्याच्या चकरा मारत आहेत.