कोल्हापुरातून दर महिन्याला 600 पर्यटकांची परदेश वारी

कोल्हापुरातून दर महिन्याला 600 पर्यटकांची परदेश वारी
Published on
Updated on

कोल्हापूर ; प्रवीण मस्के : निसर्गसंपन्न व सधन अशी ओळख असलेल्या कोल्हापुरातून दर महिन्याला 600 पर्यटक 'परदेश वारी' करतात. कोल्हापूर जगाच्या नकाशावर नसणे, सोयीसुविधांचा अभाव, यामुळे गेल्या पाच वर्षांत खास पर्यटनासाठी एकही परदेशी नागरिक कोल्हापुरात आलेला नाही.

राजर्षी शाहू महाराज यांचा जिल्हा म्हणून कोल्हापूरची जगभर ओळख आहे. कोल्हापूरला नैसर्गिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे. प्रत्येक दोन कि.मी.वर एक पर्यटन स्पॉट आहे. कोल्हापूरला लागून कोकण, कर्नाटक राज्य आहे. जिल्ह्यात तीन हजारांपेक्षा हेरिटेज स्पॉट असतानाही कोल्हापूरची तांबडा-पांढरा रस्सा ऐवढ्यापुरती ओळख मर्यादित राहिली आहे. कोल्हापुरातून पर्यटन हंगामात एप्रिल ते जुलै व ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत दर महिन्याला 500 ते 600 जण कोल्हापुरातून परदेशात खास पर्यटनासाठी जातात. विशेषत:, थायलंड, दुबई, सिंगापूर, युरोप, श्रीलंका, नेपाळ देशांत जाणार्‍यांची संख्या जास्त आहे. देशांतर्गत पर्यटनासाठी विविध राज्यांत 1,200 लोक दर महिन्याला सहलीसाठी जातात.

तीन वर्षांपूर्वी डेक्कन ओडिसी बंद झाल्याने कोल्हापूरला परदेशी पर्यटक आलेले नाहीत. यापूर्वी किमान 10 ते 50 परदेशी पर्यटक कोल्हापूरला भेट देत असत, असे टुरिस्ट एजंटनी सांगितले. इतर जिल्हे व राज्याच्या तुलनेत कोल्हापूर जगाच्या नकाशावर ठळकपणे आलेले नाही. पर्यटनस्थळांचे मार्केटिंग देश व आंतरराष्ट्रीयवर अद्याप झालेले नाही. आंतरराष्ट्रीय विमान कनेक्टिव्हिटी नसल्याने मर्यादा येत आहेत. हजारो हेरिटेज साईटस् आहेत; पण हे सांगणारी अपडेटेड सरकारी वेबसाईट नाही. टुरिस्ट स्पॉट ठरलेले नाहीत. पर्यटनस्थळांची व्यवस्थित माहिती देणार्‍या गाईडची वानवा आहे. महापुरामुळे जून ते सप्टेंबर या काळात पर्यटक कोल्हापुरात येण्यास धजावत नाहीत.

एप्रिल महिन्यात काश्मीरमध्ये एकाचवेळी 1 हजार पर्यटक

कोल्हापुरातून उत्तर, दक्षिण भारतासह देशाच्या विविध भागांत पर्यटनासाठी जाणार्‍या पर्यटकांची संख्या वाढत आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात एकाचवेळी कोल्हापुरातील एका दिवशी एक हजार पर्यटकांनी काश्मीरचा दौरा केला, हा एक वेगळा विक्रम झाला आहे. पुण्यानंतर पर्यटनासाठी खर्च करणार्‍यांमध्ये कोल्हापूरकरांचा समावेश आहे.

कोल्हापुरातून इतर राज्ये व परदेशात जाणार्‍या पर्यटकांची संख्या जास्त आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत परदेशी पर्यटक कोल्हापुरात आलेले नाहीत. परदेशात जाणारे लोक व एजंटनी कोल्हापूरची माहिती तेथील लोकांपर्यंत पोहोचवावी. पर्यटनासंदर्भातील विचारांची देवाण-घेवाण करणे गरजेचे आहे. विमानसेवेबरोबरच इतर सुविधांचा विकास झाला पाहिजे.
– बळीराम वराडे, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news