कोरोनाच्या तिसर्या लाटेत ‘ब्रेन स्ट्रोक’चा मोठा धोका, तुटताहेत मेंदूतल्या नसा!
पाटणा ; वृत्तसंस्था : कोरोनाच्या तिसर्या लाटेत 'ब्रेन स्ट्रोक'चा मोठा धोका आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर मेंदूतील नसा कमकुवत होऊन त्या तुटण्याचे प्रकार समोर येत आहेत. बिहारमधील विविध रुग्णालयांतून कोरोना तून बरे झालेल्या लोकांमध्ये ब्रेन स्ट्रोकचे प्रकार बघायला मिळत आहेत.
दुसर्या लाटेत कोरोनातून बरे झालेल्या लोकांमध्ये ब्लॅक फंगस, यलो फंगस, हर्पीझ झोस्टर असे नवे आजार उद्भवल्याचे बघायला मिळाले, तसा तिसर्या लाटेत 'ब्रेन स्ट्रोक' बघायला मिळतो आहे.
पाटणा येथील 'इंदिरा गांधी आयुर्विज्ञान संस्थान'ने (आयजीआयएमएस) कोरोना संक्रमितांमध्ये वेगाने वाढत असलेल्या ब्रेन स्ट्रोकच्या प्रकारांवर सखोल संशोधनाची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. 'आयजीआयएमएस'मध्ये 15 दिवसांत दाखल झालेल्या ब्रेन स्ट्रोकच्या 42 पैकी 30 रुग्णांची प्रकरणे 'पोस्ट कोरोना इंडक्टर' (कोरोनातून बरे झाल्यानंतर उद्भवलेला प्रकार) आहेत.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत 'पोस्ट कोरोना'मध्ये एकही ब्रेन स्ट्रोकचे प्रकरण समोर आले नव्हते. तिसर्या लाटेत बिहारमध्ये ओमायक्रॉन संक्रमितांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यात आता ब्रेन स्ट्रोकच्या समस्येची नवी भर पडली आहे.
पाटणा येथे ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांना खाटा मिळणे कठीण झाले आहे. शनिवारी एकाच दिवसात 'आयजीआयएमएस'मध्ये ब्रेन स्ट्रोकचे 8 नवे रुग्ण दाखल झाले. अलीकडेच 35 रुग्ण दाखल झालेले होते. 15 दिवसांत असे एकूण 42 हून जास्त ब्रेन स्ट्रोक रुग्ण दाखल झाले आहेत. 40 वर वय असलेल्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
ब्रेन स्ट्रोकच्या दाखल 42 पैकी 30 रुग्णांना आधी कोरोनाची लागण झाली होती. उर्वरित 12 जणांनाही लागण झाली असावी; पण लक्षणे दिसली नसावीत. कोरोनामुळे मेंदूतील नसा कमकुवत झाल्या आणि नंतर रक्तदाबामुळे तुटल्या, असे घडलेले असणे शक्य आहे; पण अधिक संशोधन व्हायला हवे.
– डॉ. मनीष मंडल, वैद्यकीय अधीक्षक, 'आयजीआयएमएस', पाटणा

