

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी मुख्य संशयित डॉ. वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे (वय 48, रा. कोल्हापूर) याच्यासह 10 आरोपींविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी दोषनिश्चिती करण्यात आली. आरोपींनी पानसरे यांची हत्या आणि कटाचा आरोपही नाकबूल केला. पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश (3) एस. एस. तांबे यांच्या न्यायालयात झालेल्या दोषनिश्चितीमध्ये डॉ. तावडेसह समीर विष्णू गायकवाड (सांगली), अमोल अरविंद काळे (पिंपरी चिंचवड), वासुदेव भगवान सूर्यवंशी (जळगाव), भरत जयवंत कुरणे (बेळगाव), अमित रामचंद्र डेग्वेकर (दोडामार्ग, सिंधुदुर्ग), शरद भाऊसाहेब कळसकर (औरंगाबाद), सचिन प्रकाशराव आंदुरे (औरंगाबाद), अमित रामचद्र बद्दी (हुबळी), गणेश दशरथ मिस्कीन (धारवाड) यांचा समावेश आहे.
याप्रकरणी 12 आरोपींविरुद्ध यापूर्वीच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. वरील 10 आरोपींशिवाय विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, कराड) व सारंग दिलीप अकोळकर-कुलकर्णी (शनिवार पेठ, पुणे) या दोघांना न्यायालयाने फरार घोषित केले आहे; तर समीर गायकवाडची जामिनावर सुटका झाली आहे. दोषनिश्चितीसाठी आरोपींना न्यायालयात हजर ठेवण्याच्या निर्देशानुसार डॉ. तावडेसह तिघांना येरवडा कारागृह तर सचिन आंदुरे, शरद कळसकरसह सहा जणांना बंगळूरच्या मध्यवर्ती कारागृहातून बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले.
दुपारी 2.55 वाजता न्यायालयीन कामकाजाला सुरुवात झाली. जिल्हा व सत्र न्यायाधिश तांबे यांनी सुरुवातीला आरोपी गणेश मिस्कीनला उद्देशून पानसरे हत्येचा गुन्हा कबूल आहे का? असे विचारले. त्यावर आरोपीने हे नाकबूल असल्याचे सांगितले. आंदुरे, डेग्वेकर, काळे, कळसकर, कुरणे, सूर्यवंशी, बद्दी, डॉ. तावडे, गायकवाड यांनीही गुन्हा नाकबुल केला.
दोषनिश्चिती प्रक्रियेसाठी सरकारी पक्षामार्फत विशेष सरकारी वकिल अॅड. शिवाजीराव राणे, सहायक अॅड. हर्षवर्धन राणे, अॅड. विक्रम ईरले, आरोपींच्या वतीने अॅड, समीर पटवर्धन, अॅड. प्रीती पाटील सकाळी 11 वाजता न्यायालयात उपस्थित होते. पुणे येथील आरोपींना कोल्हापूरला आणण्यात विलंब झाल्याने दुपारनंतर कामकाज सुरू झाले. काही काळ अॅड. समीर पटवर्धन व अॅड. प्रीती पाटील न्यायालयात अनुपस्थित होत्या. डॉ. तावडे, डेग्वेकर व काळे यांनी अॅड. पटवर्धन न्यायालयात उपस्थित नाहीत. त्यांच्याशी चर्चा करून स्वाक्षरी करू देण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करून काही काळ कामकाज तहकूब केले. त्यानंतर अॅड. पटवर्धन यांच्याशी चर्चा करून आरोपींनी स्वाक्षरी केली.
आरोपींच्या नातेवाईकांनी न्यायालयात गर्दी केली होती. मात्र सुरक्षा यंत्रणेने आरोपींना भेटण्यास नातेवाईकांना मज्जाव केला.
न्यायालयीन सुनावणीसाठी बंगळूर येथील मध्यवर्ती कारागृहातून 6 आरोपींना रविवारी रात्री उशिरा कोल्हापुरात आणले. लांबच्या प्रवासामुळे सुरक्षा यंत्रणांवर मर्यादा येत आहेत. बंगळूर येथील पोलिस अधिकार्यांनी हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. एक दिवस आरोपींना कळंबा जेलमध्ये ठेवण्याची विनंती केली. मंगळवारी त्यांना बंगळूरला हलविण्यात येणार आहे.
खटल्याची पुढील सुनावणी सोमवार दि. 23 जानेवारीला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खटल्याची नियमित सुनावणी शक्य असल्याचे सांगण्यात आले.