कैलास पाटील ‘डबलढोलकी’, महाराष्ट्राची करत आहेत दिशाभूल : तानाजी सावंत

File Photo
File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कळंब-उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी महाराष्ट्राची दिशाभूल केली आहे. त्यांची सुरतमधून मुंबईकडे परतीच्या प्रवासाची आम्ही व्यवस्था करून दिली. प्रचंड पाऊस पडत असताना 4 किलोमीटर चालत गेले असल्याचा कैलास पाटील यांनी केलेला दावा साफ खोटा आहे. खोटं आणि आभासी कथानक रचून ते मातोश्रीची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत हे दुर्दैवी आहे. डबलढोलकी असणारे आमदार कैलास पाटील यांच्या पासून पक्ष प्रमुखांनीही सावध राहावं, असे स्पष्ट मत शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी मांडले आहे.

दरम्यान, उस्मानाबादचे शिवसेना आमदार कैलास पाटील आणि अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. आज वर्षा बंगल्याबाहेर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात कैलास पाटील आणि नितीन देशमुख बोलत होते.

कैलास पाटील म्हणाले, त्या रात्री मला एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील बंगल्यावर बोलावले. ते नगरविकास मंत्री असल्यामुळे तिथे काही काम असेल, असे वाटल्याने आणि मी लगेच गेलो. तिथून मला ठाणे महापौर बंगल्यावर नेण्यात आले. एक गाडी बदलून आम्ही निघालो. मला वाटले की कुठे घरी वगैरे जायचे असेल. पुढे ठाणे गेले, वसई-विरार गेले, मला या भागातील फारशी माहिती नाही, पण अनेक शहरे मागे पडली आणि मला लक्षात आले की काहीतरी वेगळे घडत आहे. पुढे बॉर्डरवर चेकपोस्ट दिसला, तेव्हा मनात शंकेची पाल चुकचुकली. आपल्याला चुकीच्या दिशेने नेले जातंय, हे माझ्या लक्षात आलं.

पुढे नाकाबंदी होती, तेव्हा ते म्हणाले की चालत येता का. मी या संधीचा फायदा घेतला. तिथे दीड किमीपर्यंत ट्राफिक होतं. मी गाडीचे दार उघडून बाहेर पडलो आणि डिव्हायडर ओलांडून मुंबईच्या दिशेने निघालो. ३००-४०० मीटर गेल्यावर माझ्या लक्षात आले, की आता हे आपल्या मागे येतील. म्हणून मी पुन्हा सूरतच्या दिशेने असलेल्या ट्राफिकमध्ये शिरलो. ट्रकच्या रांगांमधून चालत राहिलो. एका बाईकवाल्याने मला गावापर्यंत सोडले. तिथे एका हॉटेलजवळ काही ट्रकवाल्यांना विचारले, काही खासगी वाहनांना विचारले, पण त्यांनी मला सोडले नाही.

यावेळी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करुन सांगितले, काही खासदारांना कॉल केला. मोबाईलची बॅटरी ७-८ टक्क्यावर आली होती. ती संपत जाईल म्हणून मी लाईव्ह लोकेशन पाठवू शकलो नाही. पुढे एका यूपीच्या ट्रकवाल्याने माझी विनंती मान्य केली. या काळात पाऊस सुरुच होता, मी भिजत होतो. त्याने मला दहिसर टोलनाक्याजवळ सोडले. तो अक्षरशः देवदूतासारखा भेटला. मी त्याच्यासोबत सेल्फीही काढला. मी कोण आहे हे त्याला सांगितले नाही, पण माझी अडचण त्याने ओळखली. ज्या शिवसेनेने मला जिल्हाप्रमुख, आमदार केले, त्यांच्याशी प्रतारणा करणे मला पटले नाही, असेही सांगायला कैलास पाटील विसरले नाहीत.

आमदार नितीन देशमुख यांचेही गंभीर आरोप

बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले बाळापूर मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे आमदार नितीन देशमुख हे राज्यात परतल्यानंतर त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. आपल्यासोबत घडलेला प्रकार त्यांनी माध्यमांसमोर कथन केला. देशमुख हे विधानपरिषद निवडणूक निकालाच्या रात्रीपासून नॉटरिचेबल होते. ते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण सुरतमध्ये गेल्यानंतर पहाटेच्या सुमारास नितीन देशमुख यांच्या अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती समोर आली होती. पण आता देशमुख राज्यात परतल्यानंतर त्यांच्याबाबतीत नेमकं काय घडलं होतं? याचा खुलासा केला आहे.
माझ्या शरिरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचे षडयंत्र रचले होते. मी उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे, मला अटॅक आला नव्हता. त्यांचा हेतू चुकीचा आहे. रुग्णालयात नेल्यानंतर माझ्या दंडात जबरदस्तीने इंजेक्शन दिले गेले, असे नितीन देशमुख यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काल अकोल्यात नितीन देशमुख यांच्या पत्नीने पती २० जूनच्या रात्रीपासून आपले पती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर सायंकाळी ६ वाजता मुंबईहून अकोल्याला येत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. त्यामुळे कोणताही संपर्क नाही. सकाळपर्यंत संपर्क झाला नसल्याचे तक्रारीत म्हटले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news