

मुंबई : पुढारी वार्ताहर : कुर्ला येथील शिवसृष्टी मार्गावरील नाईक नगर परिसरात चार मजली धोकादायक इमारत कोसळून 19 रहिवाशांचा मृत्यू झाला असून 32 जणांना ढिगार्याखालून काढण्यात आले आहे. सोमवारी रात्री ही दुर्घटना घडली.
वसंतराव नाईक सोसायटीमध्ये ए, बी, सी व डी क्रमांकाच्या पाच इमारती असून त्या धोकादायक असल्याची नोटीस यापूर्वीच पालिकेने दिली होती. मात्र काही कुटुंबे या धोकादायक इमारतींमध्ये राहत होते. या सोसायटीची सी क्रमांकाची इमारत सोमवारी रात्री 11 च्या दरम्यान कोसळली.
एकूण 13 गंभीर जखमींवर राजावाडी आणि सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 10 जणांना प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले. ठार झालेल्यांमध्ये बहुतांश परप्रांतीय कामगार असून हे सर्वजण या धोकादायक इमारतीत भाड्याने राहत होते.
कुर्ला पुर्वेकडील एसटी बस डेपो व कुर्ला रेल्वे स्थानक व शिवसृष्टी मार्गावर नाईक नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीमधील ही इमारत जीर्ण झालेली होती. 2013 पूर्वीच ती पाडून टाकावी म्हणून नोटीस बजावण्यात आली होती, असे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.
महापालिकेने सर्व रहिवाशांनाही आधीच नोटीसा दिल्या होत्या. मात्र, इमारत रिकामी न करता 32 हून अधिक कुटुंबे या इमारतीतच राहत होती. सोमवारी रात्री रहिवाशी नुकतेच झोपी गेेले आणि इमारत ढासळली. अग्निशमन दलासह घटनास्थळी धावलेल्या एनडीआरएफ च्या जवानांनी 20 तास ढिगारे उपसून 32 जणांना जीवदान दिले.
मुंबई उपनगरचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी मध्य रात्रीच आणि पुन्हा मंगळवारी दुपारी घटनास्थळी भेट दिली.
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली असून शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटानेही मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये मदत जाहीर
केली.
कुर्ल्यातील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या १९ झाली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ल्यातील इमारत कोसळून १५ जखमी आणि एकूण 19 जणांचा मृत्यू झाला आहे. आयपीसीच्या कलम ३०४(२), ३०८, ३३७, ३३८ आणि ३४ अन्वये जमीनमालक आणि दिलीप बिस्वास यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
मृतांची नावे
अजय भोला बास्कोट 28 वर्षे
अजिंक्य गायकवाड 34 वर्षे
ईश्वर प्रजापती 20 वर्षे
शिकंदर राजभार 21 वर्षे
अरविंद भारती 19 वर्षे
अनुप राजभार 18 वर्षे
अनिल यादव 21 वर्षे
श्यामु प्रजापती 18 वर्षे
लिलाबाई गायकवाड 60 वर्षे
रमेश नागशी बडीया 50 वर्षे
गुड्डू लालिंदर बास्कोट 35 वर्षे
बिरजू रमाधार माजी 21 वर्षे
राहुल रमाधार माजी 24 वर्षे
पप्पू रमाधार माजी 35 वर्षे
महेश कोविलराम माजी 40 वर्षे
विनोद माजी 35 वर्षे
प्रल्हाद गायकवाड 64 वर्षे
अनोळखी इसम 30 वर्षे
एक अनोळखी सायनमध्ये मयत
मी, मध्यप्रदेशमध्ये रहातो काही दिवसांपूर्वी मुंबईला
कामानिमित्त आलो. आई वडील गावी आहेत. इमारत धोकादायक असल्याचे मालकाला सांगितले होते.परंतु दुर्लक्ष केले. अगदी कमी भाड्यात ह्या धोकादायक इमारती मधील घरे मूळ मालकांनी भाड्याने दिली होती. इथे मुख्यतः मजूर, भाड्याने रहायला आले होते. काही कुटुंब तर आता आता गेल्या आठवड्यात रहाण्यास आली होती.
– मनतोष कुमार गौड, स्थानिक रहिवासी
वर्षभरापासून ही इमारत धोकादायक असल्याचे मालकाला सांगितले होते. मात्र मालक कुछ नाही होगा रहो बिनधास्त असे सांगत वेळ मारून नेत होता. या इमारतीच्या तिसर्या मजल्यावरील खोलीत एकूण 11 जण राहत होते. रात्री जेवण करुन बसलो होतो अचानक इमारतीला भेगा पडून आवाज येऊ लागला. इमारत डोळ्यासमोरच कोसळली. पडायला जागा मिळाला ही नाही.
– हृदनाथ यादव, स्थानिक रहिवासी
प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आहेत. इथे कोणीही गर्दी करता कामा नये, मदत कार्य आणि उपचार कार्य योग्य पद्घतीने सुरू आहेत.
– सुभाष देसाई, शिवसेना नेते
सदर इमारत सी1 वर्गातील होती, नंतर तिचे ऑडिट करून तिला सी2 करण्यात आले.मात्र नागरिकांनी या बाबत काळजी घ्यायला पाहिजे सी1 किंवा सी 2 पातळी वर असलेल्या इमारती रिकाम्या कराव्यात, तिथल्या प्रशासनाचे ऐकावे, अशा दुःखद घटना घडता कामा नये, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
– आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री
या इमारतीमधील रहिवाश्यांना घरे खाली
करण्यासाठी पालिकेने नोटीस दिल्या होत्या. सध्या या ठिकाणी कोणीही घरमालक राहत नव्हते काही भाडेकरू कुटुंब व एका बिल्डरचे मजूर राहत होते. 21 जण मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांशी मजूर आहेत.
– प्रविणा मोरजकर, माजी नगरसेविका