

भोपाळ : मध्य प्रदेशच्या श्योपूर जिल्ह्यात असलेले कुनो नॅशनल पार्क तिथे सोडण्यात आलेल्या चित्त्यांमुळे चर्चेत आले होते. आता हे पार्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या नॅशनल पार्कमध्ये प्राचीन नाणी सापडली आहेत. कुनो नॅशनल पार्कमध्ये कर्मचार्यांसाठी घरं बांधण्यात येत आहे. यासाठी पालपूर किल्ला क्षेत्रात खोदकाम सुरू करण्यात येत आहे. याच परिसरात नामिबिया येथून आणण्यात आलेल्या चित्त्यांना ठेवण्यात आले आहेत.
खोदकाम करत असताना अचानक मजुरांना एका ठिकाणी टणक वस्तू लागली. त्यानंतर त्यांना आजूबाजूची जमीन उकरून काढली. तेव्हा त्यांना तांबे आणि चांदीच्या नाण्यांनी भरलेला हंडा सापडला. जमिनीपासून काही फूट खाली हा हंडा पुरून ठेवण्यात आला होता. दरम्यान, याबाबत संबंधित अधिकार्यांनी आपल्याला काहीच माहिती नसल्याचे म्हटले आहे. तर, डीएफओ पीके वर्मा यांनी याबाबत माहिती घेऊन चौकशी करू, असे म्हटले आहे.
बुधवारी तिथे काम करणार्या मजुरांना नाण्यांनी भरलेला हंडा सापडला आहे. ज्या मजुरांना हा हंडा सापडला आहे त्यांनी सापडलेली नाणी आपापसांत वाटून घेतली असून ते गायब झाले आहेत. गुरुवारी हे मजूर कामावरच आले नाहीत. तसेच, काही मजुरांनी गुरुवारी याचे फोटो काढून व्हॉटस्अॅप स्टेटसवर टाकले होते. स्टेटस पाहिल्यानंतर ही बातमी जंगलात वार्यासारखी पसरली. आजूबाजूच्या गावांतही ही बातमी पसरली आहे.पालपूर राजघराण्याने कुनो नॅशनल पार्कसाठी 1 एकर जमीन दान केली होती.