

तासवडे टोलनाका ; पुढारी वृत्तसेवा : पुणे – बंगळूर महामार्गावरील तासवडे व किणी टोलनाके राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्यानंतर टोल दरात वाढ झाली आहे. मात्र त्यातही तासवडे टोल नाक्यावर किणी टोलनाक्यापेक्षा 5 रूपये ते 45 रुपये पर्यंतची जादा दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांना टोल दर वाढीबरोबरच तासवडे टोलवर जादा रक्कमेचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे वाहन चालकांसह स्थानिकांमध्ये या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
2 मे 2022 ला महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची टोल वसुलीची मुदत संपली होती. मात्र कोरोना व महापूर या कालावधीत काही दिवस टोल वसुली बंद होती. त्यामुळे टोल वसुलीस मुदत वाढ त्यांना देण्यात आली होती. त्यामुळे ती मुदत 25 जून 2022 पर्यंत वाढवण्यात आली होती. त्यामुळे दोन दिवसापूर्वी मध्यरात्री हे दोन्ही टोलनाके राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून पूर्वीच्या दरात वाढ करत प्रत्येक वाहन चालकाला 10 रूपये ते 15 रुपये दरवाढ करण्यात आली. मात्र दरवाढीनतंर ही किणीपेक्षा तासवडे टोलनाका 5 रूपये ते 45 रुपये टोलमध्ये रक्कम वाढवण्यात आली आहे. त्यामुळे किणीपेक्षा तासवडे टोलनाक्यावर वाहन चालकांना टोल वाढीबरोबरच अतिरिक्त दरवाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
या विरोधात वाहन चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, गेल्या 20 वर्षापासून स्थानिकांना किणी आणि तासवडे टोलनाक्यावर मोफत प्रवास करता येत होता. मात्र हे दोन्ही टोलनाके राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे गेल्यानंतर स्थानिकांना 315 रुपयांचा मासिक पास देण्याची घोषणा केली आहे. मात्र याविरोधात स्थानिकांनी आवाज उठवला असून आमच्या जमिनी, व्यवसाय, घरे या महामार्गाच्या रुंदीकरणामुळे भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे आम्हाला मोफत पास देण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.