

वडूज/खटाव ; पुढारी वृत्तसेवा : मी नेहमी चुकीचे वागणार्यांना बोलतो. कुणालाही कसेही बोललो असतो तर बारामतीकरांनी 30 वर्षे निवडून दिले नसते. सातारा जिल्ह्यातील काही लोकांना तुपात आणि साखरेत घोळले तरी ते चुकीचेच वागतात. ते आपले राहात नाहीत. आता मी स्वतः सातारा, कोरेगाव, माण आणि खटावकडे लक्ष देणार आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या या तीन जागा गेल्याची किंमत आम्हाला मोजावी लागली आहे. जे चुकीचे वागलेत, त्यांना बाजूला केले तरी चालेल, अशा सूचना ना. अजित पवार यांनी पक्षाच्या वरिष्ठांना केल्या.
खा. शरद पवार यांच्या सूचनेनुसार वडूज येथे उभारण्यात आलेल्या मॉड्युलर कंटेनर जम्बो कोव्हिड हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि. प. उपाध्यक्ष प्रदीप विधाते, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, नितीन देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदि उपस्थित होते.
ना. अजित पवार म्हणाले, खटाव-माणच्या जनतेने चूक केली. देशमुखांना निवडून दिले असते तर विकासकामांसाठी अधिक प्रयत्न झाले असते. दादा जे बोलतो ते करतो. आमचे लोक प्रश्न धसास लावणारे आहेत. जिल्ह्यातील माण-खटाव, सातारा, कोरेगाव येथील गेलेल्या जागांची किंमत आम्हाला चांगलीच समजली असल्याचेही ते म्हणाले.
राज्य सरकारचे उत्पन्न एक लाख कोटींनी कमी झाले आहे. कोरोना काळात निधीची कमतरता भासूनही विकासकामांवर परिणाम न होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. राज्यसरकार लवकरच आणखी 500 रुग्णवाहिका घेणार आहे. आरोग्य विभागाची परीक्षा लवकरच घेऊन भरतीही केली जाणार आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्यास आमचे सरकार कटीबद्ध आहे.
4 तारखेला शाळा सुरु करण्याबरोबरच दि. 2 ऑक्टोबर रोजी होणार्या बैठकीत निर्बंधात आणखी शिथिलता देण्याबाबत विचार होणार आहे. टाळाटाळ न करता सर्वांनी लसींचे दोन डोस घेणे गरजेचे आहे. 12 ते 18 वयोगटासाठीही लवकरच लसीकरण सुरु केले जाणार आहे. सातारा अधिक रुग्णसंख्येचा जिल्हा असल्याने चांगली काळजी घ्या. दुसर्या लाटेत ज्या दिवशी सर्वाधिक रुग्ण होते त्याच्या दिडपट रुग्णांची व्यवस्था निर्माण करा, अशा सुचना ना. अजितदादांनी दिल्या.
सातारा जिल्ह्यातील सैनिक स्कूलचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी 300 कोटींचा निधी दिला आहे. जिहे-कठापूर योजनेचा शुभारंभ पवारसाहेबांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बारामतीचे वैद्यकीय महाविद्यालय सातार्याच्या मागून बांधून पूर्ण झाले. इथे काही जणांमुळे विलंब झाला. काम करायची धमक लागते. आता आम्ही वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत आणि सदनिकांच्या कामाचे टेंडर लवकरच काढणार आहोत.
अमेरिका – इंडिया फाऊंडेशनचे संचालक मॅथ्यू जोसेफ म्हणाले, मॉड्यूलर जम्बो कोविड रुग्णालयांसाठी अमेरिकेतील काही कंपन्या आणि भारतीयांनी निधी दिला आहे. या हॉस्पिटल्समधून रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे. प्रभाकर देशमुख यांनी वडूजचे रुग्णालय तालुक्यातील रुग्णांसाठी वरदान ठरणार असल्याचे सांगितले.
यावेळी मानसिंगराव जगदाळे, सुरेंद्र गुदगे, अर्जुन खाडे, नंदकुमार मोरे, जयश्री कदम, इंदिरा घार्गे, सुनील गोडसे, किशोरी पाटील, शोभा माळी, सुवर्णा चव्हाण, सुनिता कुंभार, काजल वाघमारे, प्रांत जनार्दन कासार, तहसिलदार किरण जमदाडे, डॉ. चिवटे, डॉ. भादुले, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पधाधिकारी उपस्थित होते.