कारगिल युद्ध : ‘नो मोअर कारगिल’साठी कायमचा युद्ध तळ!

कारगिल युद्ध
कारगिल युद्ध
Published on
Updated on

कारगिल युद्धात जीवाची बाजी लावून हजारो जवान निकराने लढले. त्यांपैकीच एक कर्नल गौतम खोत. त्यांनी कारगिल युद्धात केलेल्या असीम पराक्रमाचा गौरव म्हणून त्यांना वीरचक्र हा सर्वोच्च शौर्य पुरस्कार बहाल करण्यात आला. आता ते सेवानिवृत्त असले तरीही त्यांची लढाऊ विमानोड्डाणाची जिगर कायम असल्याने ते खासगी विमान कंपनीत काम करतात. सध्या ते पुण्यात राहतात. कारगिल युद्धावेळी त्यांचे वय अवघे 32 होते. पुण्याच्या 'एनडीए'मधून 1987 साली लष्करात ते थेट अधिकारी पदावर भरती झाले आणि पुढे कर्नल झाले. कर्नल खोत यांनी कारगिल युद्धातील सांगितलेला थरारक अनुभव त्यांच्याच शब्दांत…

त्यावेळी बरेली येथे पोस्टिंगला होतो. 4 जूनला आदेश आला… 5 जूनला तत्काळ श्रीनगरला पोहोचा! विमानाने श्रीनगर गाठले.

समुद्रसपाटीपासून 18 हजार फूट उंचीवर भारत-पाकिस्तानच्या सैन्यात घनघोर युद्ध सुरू होते. कामगिरीवर हजर झालो. तब्बल शंभर तास उड्डाणे करून शेकडो जखमी सैनिकांना हेलिकॉप्टरने सुरक्षितस्थळी आणले. या युद्धात भारताचा विजय झाला. आजही त्या आठवणींनी अंगावर रोमांच उभे राहतात.

अठरा हजार फूट उंचीवरील अवघड लढाई

कारगिल युद्ध मे ते जुलै 1999 दरम्यान झाले. युद्ध सुरू झाले तेव्हा माझे पोस्टिंग बरेली येथे होते. कारगिल जिल्ह्यात भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाले आहे. तुम्ही 5 जूनला तत्काळ श्रीनगरला पोहोचा, असा आदेश मला 4 जून 1999 रोजी मिळाला. तत्काळ
श्रीनगरला पोहोचलो. 18 हजार फूट उंचीवर असलेल्या या प्रदेशात घनघोर युद्ध सुरू झाले होते. माझा बेस सोनमर्ग येथे होता. युद्धात जखमी होणार्‍या सैनिकांवर सतत लक्ष ठेवून त्यांना हेलिकॉप्टरने तत्काळ सुरक्षित जागी हलवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ही सर्वांत अवघड लढाई होती. दोन्ही बाजूंनी क्षणाक्षणाला बॉम्बवर्षाव सुरू होता. तो चुकवत छोट्या हेलिकॉप्टरने जखमी सैनिकांना मी सुरक्षितस्थळी आणत होतो.

कोणतेही शस्त्र न घेता हेलिकॉप्टर चालवले!

वायुदल आणि लष्कराच्या विशेष वायुदलात फरक असतो. युद्धभूमीवर खूप लहान आकाराच्या हेलिकॉप्टरने सहभागी व्हावे लागते. त्यात दोन्ही बाजूंनी सुरू असलेला गोळीबार आणि बॉम्बवर्षाव चुकवत जखमी सैनिकांवर नजर ठेवावी लागते. आम्हाला हेलिकॉप्टर चालवताना जवळ शस्त्र ठेवता येत नाही. हेलिकॉप्टरमधून एकावेळी एकाच सैनिकाला आणता येते.

या परिस्थितीत शंभर तासांचे उड्डाण करून शेकडो सैनिकांचे प्राण वाचवता आले. त्याचे खूप समाधान आहे. 26 जुलै 1999 रोजी भारताने हे युद्ध जिंकले. ऑपरेशन विजय फत्ते झाले. भारतीय जवानांनी 18 हजार फूट उंचीवर आपला तिरंगा फडकवला आणि विजयाचा एकच जल्लोष झाला.

या युद्धात विशेष कामगिरी केल्याबद्दल भारत सरकारने 40 हून अधिक जवानांचा सन्मान केला. त्यात महाराष्ट्रातून मी आणि सचिन निंबाळकर या दोन अधिकार्‍यांचा समावेश होता. मला तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले.

'नो मोअर कारगिल'साठी कायमस्वरूपी उपाय

देशाच्या सीमेवर किंवा कारगिल परिसरात पुन्हा युद्ध होऊ नये आणि तशी परिस्थिती उद्भवू नये, म्हणून भारताने तेथे कायमस्वरूपी बेस कॅम्प लावले आहेत. 'नो मोअर कारगिल'साठी 18 हजार फूट उंचीवर अत्यंत प्रतिकूल वातावरणात आपले जवान त्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून जागता पहारा देत सतत देशरक्षणासाठी तत्पर असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news