कापूस दरवाढीने राज्यात वस्त्रोद्योग संकटात

कापूस दरवाढीने राज्यात वस्त्रोद्योग संकटात
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कापूस दरवाढ राज्यातील सूत गिरण्या आणि यंत्रमाग उद्योगासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. दरवाढ सुरु राहिली तर सर्व सूत गिरण्या व यंत्रमाग कारखाने कोणत्याही क्षणी बंद पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कापसाच्या अपुर्या पुरवठ्यामुळे दक्षिण भारतातील दि साऊथ इंडिया स्पिनर्स असोसिएशन कोईमतूर यांनी कापसाचे नवीन उत्पादन येईपर्यंत सूत गिरण्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील सहकारी व खाजगी सूत गिरण्या बंद करण्याचा निर्णय जाहीर करावा अशी मागणी अनेक सूत गिरण्या चालकांनी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात लवकरच महाराष्ट्रातील सूत गिरण्यांचे संचालक वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहे. त्यानंतरच सूत गिरण्या बंद ठेवण्याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे, अशोक स्वामी यांनी सांगितले.

गत वर्षी भारतात कापसाचे उत्पादन 70 टक्केच झाल्याने कापसाचे दर वाढले. परिणामी त्याचा फायदा कापूस व्यापार्यांनी घेतला. त्यावर नियंत्रण आणण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याने फटका सूत गिरण्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. सध्या खुल्या बाजारात कापसाचा दर 1 लाख 10 हजार प्रति खंडी आहे. या दराने जरी कापूस खरेदी करायचा म्हटले तरी व्यापारी लोक कापसाची उपलब्धता अल्प असल्याचे सागंत सूत गिरण्यांना अक्षरशः नागवत आहेत.

केंद्र सरकारने कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी कापसाचा हमी भाव 6 हजार 50 रुपये असा ठरवून दिला आहे. परंतू खुल्या बाजारात शेतकर्यांना व्यापार्यांकडून 13 हजार इतका प्रचंड दर मिळत असल्यामुळे शेतकरी आपला कापूस खाजगी व्यापार्यांना विकत आहेत. येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होत असल्याने शेतकर्यांनी आपला सगळा कापूस खुल्या बाजारात विकला आहे. त्यामुळे शेतकर्यांकडे आजमितीला अजिबात कापूस शिल्लक नाही अशी स्थिती आहे.

सूत गिरणी व्यवस्थापन कापूस खरेदीसाठी बाजारात फिरत आहे. परंतू, बाजारपेठेत कापसाची वाणवा जाणवत आहे. सध्या सूत गिरण्यांकडे आठवडाभर पुरेल इतकाच कापूस साठा शिल्लक आहे. ही परिस्थिती बदलेल असे सध्या तरी दिसून येत नाही. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सूत गिरण्या बंद पडण्यास सुरवात होण्याची भिती व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news