

कागल : पुढारी वृत्तसेवा : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत कागल मध्ये हृदयस्पर्शी भाऊबीज सोहळा झाला. अतिशय भावनिक अशा या सोहळ्यात कोरोना काळात सौभाग्य गमावलेल्या साडेआठशेहून अधिक बहिणींनी आपला भाऊ हसन मुश्रीफ यांचे औक्षण केले. ना. हसन मुश्रीफ फाऊंडेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शूर महाराणी ताराराणी यांच्याप्रमाणे लढाऊ बाण्याने जिद्दीने लढा, अशी ऊर्जाही त्यांनी उपस्थित माता-भगिनींना दिली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, तुमच्यावर कसलेही संकट आले तर तुमच्या भावाला फक्त एक हाक द्या. हरएक परिस्थितीत तुमचा हा भाऊ तुमच्या संरक्षणासाठी तुमच्या पाठीशी हिमालयासारखा उभा आहे.
कोरोना महामारीने सौभाग्य गमावलेल्या बहिणींसाठी ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेदने वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा या नावाने नवी योजना सुरू केली आहे. त्यांतर्गत अशा माता-भगिनींनी स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानजनक उपजीविकेसाठी रोजगार, स्वयंरोजगार व व्यवसायासाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण, बचत गटांसाठी बिनव्याजी कर्ज व अनुदान तसेच व्यवसायासाठीही निधी दिला जाणार आहे.
कोरोना महामारीमुळे सौभाग्य गमावलेल्या माझ्या हजारो बहिणींची ही पहिली दिवाळी आहे. त्यांना धीर द्यावा, या भावनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अनाथ मुलांसाठी पाच लाख देण्याचे धोरण सरकारने ठरवले आहे. कुटुंबप्रमुख पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर वारसा हक्काने तातडीने त्याच्या पत्नीचे नाव घराच्या मालकी हक्कामध्ये लावायचे, त्याच्या शेतीची मालकी त्याच्या पत्नीच्या नावावर करायची, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ वृद्धापकाळ यांसारख्या योजनांचा लाभ तातडीने द्यावयाचा तसेच घरकुलासह जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र या सर्व कामांसंदर्भात सरकारी अधिकारी, कर्मचारी ऐकत नसेल तर थेट मला फोन करा, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक भय्या माने, सौ. नबीला अबीद मुश्रीफ, सौ. अमरीन नवीद मुश्रीफ, सौ. वृषाली पाटील, नगरसेविका रहीमा मकानदार, पद्मजा भालबर यांनी मनोगत व्यक्त केले.
कागल मध्ये यावेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, पी. बी. घाटगे, नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, माजी नगराध्यक्षा आशाकाकी माने, सौ. सबिना साजिद मुश्रीफ, रमेश तोडकर, शशिकांत खोत, शिल्पा खोत, अर्चना पाटील, अंजना सुतार, विकास पाटील, संगीता गाडेकर, शर्मिली मालणकर, नम्रता भांदिगरे, उषा सातवेकर, संजय चितारी, राजश्री माने, नितीन दिंडे, माधवी मोरबाळे, नगरसेविका अलका मर्दाने, शोभा लाड, सतीश घाडगे, नूतन गाडेकर, रुपाली परीट, हरुण सय्यद, प्रकाश नाळे, रवींद्र पाटील, रंगराव पाटील, नेताजी मोरे, राजेंद्र माने, बळवंत माने, रियाज जमादार, उदय परीट, महेश सलवादे, दत्तात्रय पाटील, किसन मेटील, आशाकाकी जगदाळे आदी उपस्थित होते.
स्वागत मनीषा पाटील यांनी केले. शीतल फराकटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विवेक गवळी व विशाल बेलवळेकर यांनी केले. आभार माजी जिल्हा परिषद सदस्या शैलजा पाटील – गिजवणेकर यांनी मानले.
प्रत्येकाच्या घरी भाऊबीजेचा सण असतानाही माता – भगिनी या हृद्य अशा भाऊबीज सोहळ्यासाठी उपस्थित होत्या. या बहिणींना ऊर्जा देताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, तुमच्यावर आलेले संकट मोठे असले तरी डगमगू नका, खचून जाऊ नका. कारण सासू – सासर्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. दुःख बाजूला सारून कंबर कसून मुलाबाळांच्या भविष्यासाठी रणरागिणी बनून जिद्दीने उभे राहा. यावेळी उपस्थित माता-भगिनी गहिवरल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.