कागदपत्रांत अफजलखानाच्या एकाच कबरीचा उल्लेख

कागदपत्रांत अफजलखानाच्या एकाच कबरीचा उल्लेख
Published on
Updated on

तत्कालीन कागदपत्रे, विविध संदर्भ ग्रंथ, स्केच व छायाचित्रांमध्येही प्रतापगडाच्या पायथ्याशी केवळ अफजलखानाच्या एकाच कबरीचे उल्लेख आणि संदर्भ मिळतात. इसवी सन 1836 च्या ग्रँड डफच्या 'हिस्ट्री ऑफ मराठाज'या ग्रंथात अफजलखानाच्या कबरीचा उल्लेख आहे.

1849 च्या एका स्केचमध्येही प्रतापगडाच्या पायथ्याशी केवळ एकच कबर दिसते. हे चित्र 'व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन' येथे आहे. या सर्व कागदपत्रांत सय्यद बंडाच्या कबरीचाही उल्लेख नाही. याशिवाय तत्कालीन विविध इंग्रज अधिकार्‍यांच्या लिखाणातही यासंदर्भातील उल्लेख आहेत. इसवी सन 1818 नंतर महाबळेश्वर इंग्रजांचे 'आरोग्य धाम' म्हणून नावारूपाला आले. छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी महाबळेश्वरात 'मालकपेठ' ही बाजारपेठ निर्माण केली. त्यावेळी इंग्रज अधिकारी आंबेनळी व पालच्या घाटातून महाबळेश्वरला ये-जा करत होते. यामुळे त्यांनी या परिसरातील विविध नोंदी लिहून ठेवल्या आहेत. जेम्स डग्लसच्या 'बुक ऑफ बॉम्बे'सह विविध पुस्तके आणि पत्रव्यवहारांत यासंदर्भातील उल्लेख आहेत.

सन 1916 च्या डी. बी. पारसनीस यांच्या इंग्रजी भाषेतील 'महाबळेश्वर' या पुस्तकात 1909 पूर्वीचा फोटो प्रकाशित करण्यात आला आहे. त्यामध्येही एकच कबर दिसते. 1902 च्या कमलाकर दीक्षित यांच्या मराठी भाषेतील 'महाबळेश्वर' या पुस्तकातही प्रतापगडाच्या पायथ्याशी असणार्‍या जनीचा टेंब किंवा पालखीचा माळ येथे एकच कबर असल्याचे उल्लेख आहेत. सन 1904 ला एन्शियन्ट मॉनोमेंट प्रिझर्व्हेशन अ‍ॅक्ट (प्राचीन वास्तू संवर्धन कायदा) लागू झाला. यात 1908 ला अफजलखानाच्या कबरीचीही नोंद आहे.

1909 नंतर खानाच्या कबरीचे उदात्तीकरण

1909 ला हैदराबाद येथील पीर सय्यद हाजी महंमद कासीम शहा चिश्ती ही व्यक्ती अफजलखानाच्या कबरीजवळ आली होती. धार्मिक प्रवृत्तीच्या या व्यक्तीने कबरीजवळ ध्यान धरले. त्यावेळी त्याला अफजलखान सिंहासनावर बसला असून, त्याचे सहकारी पांढर्‍या वेशभूषेत त्याच्या सभोवती सेवेत रुजू असल्याचे दिसले. इतकेच नव्हे तर खानाने, 'माझी कबर लहान असून, ती मोठी कर,' असा आदेश दिला. मुंबईला जाऊन चिश्तीने तेथील अली खान या व्यक्तीला 60 रुपये देऊन अफजलखानाच्या कबरीच्या विस्तार करण्यास सांगितले. त्यानुसार खानाच्या कबर परिसराच्या उदात्तीकरणास प्रारंभ झाला. यासाठी ट्रस्टची स्थापना करून त्यामार्फत दरवर्षी उरुस भरविला जात होता.

न्यायालयाने ठोठावला दंड

वास्तविक शिवकालापासून अफजलखानाच्या कबरीजवळ दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार प्रतापगडावरील हवालदार येसाजी पानसरे यांच्यापासून ही व्यवस्था सुरूच होती. 1909 च्या सुमारासही हे काम सुरूच होते. यासाठी 'पिराजी' नामक हिंदू व्यक्ती सेवा देत होती. मात्र, खानाच्या कबर परिसरात नव्याने आलेल्या ट्रस्टच्या लोकांनी त्याला तेथे येण्यास विरोध केला. त्यामुळे हे प्रकरण तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांकडे गेले. त्यांच्या सूचनेनुसार न्यायालयात हिटन आणि शहा या कोर्टासमोर खटला चालला होता. यात चिश्ती व त्याचे साथीदार दोषी आढळल्याने न्यायाधीशांनी त्यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला.

याबाबत त्यांनी सातारा येथील वरिष्ठ न्यायालयात धाव घेतली. तेथे सी. किंकेड या न्यायाधीशांसमोर खटला चालला. यातही चिश्ती व त्याच्या साथीदारांवरील गुन्हा सिद्ध झाल्याने दंडाची रक्कम 1 हजार वरून 300 रुपये करण्यात आली. इसवी सन 1909 ते 1913 या कालावधीत हा खटला सुरू होता. स्वतंत्र भारतात अफजलखानाच्या कबरीचे उदात्तीकरण सुरूच होते. मुस्लिम धर्मीयांबरोबरच हिंदू लोकही दर्शनासाठी येत होते. यामुळे उरुस दरवर्षी व्हायचा. यामुळे अफजलखानाच्या कबरीभोवती अनधिकृत बांधकाम वाढतच गेले.

– इंद्रजित सावंत, इतिहास अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news