कल्याण जंक्शनजवळ एकाची गळा चिरून हत्या; दुसऱ्यास भोसकले

कल्याण जंक्शनजवळ एकाची गळा चिरून हत्या; दुसऱ्यास भोसकले
Published on
Updated on

मुंबईत मजूर म्हणून काम करणाऱ्या दोघापैकी एकाची उत्तरप्रदेशात आपल्या गावी जाताना चोरट्यांनी कल्याण जंक्शनजवळ गळा चिरून हत्या केली. दुसऱ्या सहकाऱ्याला भोसकून तेथेच फेकून दिले.

अंगावर शहारे आणणारी ही घटना डोंबिवली-कल्याण व्हाया ठाकुर्ली समांतर रस्त्यावर घडली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, मंगळवारी सकाळी तरुणाचे धड आणि मुंडके रेल्वे रुळावर आढळून आले. तर यातून बचावलेल्या गंभीर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

या लुटमारीत बचावलेल्याने दिलेल्या माहितीच्या आधारे हा सारा प्रकार उघडकीस आला असून त्याआधारे लोहमार्ग आणि शहर पोलिसांची पथके खुनी लुटारूंना हुडकून काढण्यासाठी जंग -जंग पछाडत आहेत.

बेचनप्रसाद चौहान (वय ३२ ) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर बबलू चौहान ( वय ३५) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव असून हे दोघेही डोंबिवली पूर्वेकडील शेकारनाका (त्रिमूर्ती नगर) येथे राहणारे आहेत.

शेलार नाका परिसरामध्ये बेचनप्रसाद आणि बबलू हे एका भाड्याच्या खोलीत राहत असत. तर बेचन हा पेंटिंगचे तर जखमी बबलू हा सुतार काम करत होता. हे दोघे उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात राहणारे असून गावी जाण्यासाठी सोमवारी रात्री १.२० च्या ट्रेनने पकडण्यासाठी एका रिक्षातून ठाकुर्ली समांतर रस्त्याने कल्याण रेल्वे जंक्शनकडे जात होते.

बेचेन आणि बबलू यांना चाकूच्या धाक दाखवून पैसे उकळले

इतक्यात तीन अनोळखी तरुणांनी त्यांची रिक्षा अडवून चालकाला झोडपून पळवून लावले. त्यानंतर बेचेन आणि बबलू यांना चाकूच्या धाकाने त्यांच्याकडील पैसे आणि मौल्यवान वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिबंध केल्याने लुटारूंनी त्यांना मारहाण करून शेजारच्या ठाकुर्ली रेल्वे रुळावर नेले. तेथे या दोघांवर चाकूने सपासप वार केले.

यात बबलूने लुटारूंच्या तावडीतून कसाबसा आपला जीव वाचून घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, बेचेन हा लुटारूंच्या तावडीत सापडला. जखमी बबलूने ही माहिती मध्यरात्री त्याच्या नातेवाईकांसह पोलिसांना दिली.

धड आणि मुंडके विलग झालेले

ही माहिती मिळताच मंगळवारी सकाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता बेचेन चव्हाणचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला. त्याचे धड आणि मुंडके विलग झालेले पोलीसांना सापडले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लुटीत बळी पडलेल्या तरुणाची बॅग आणि मोबाईल ताब्यात घेतले.

बेचनचा मृत्यू लुटीच्या उद्देशाने झाला असल्याची माहिती जखमी बबलू याने पोलिसांना दिली. तर ही हत्या की रेल्वे अपघात मृत्यू ? याचा तपास करण्यासाठी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने डोंबिवली लोहमार्ग आणि टिळकनगर पोलिस तपास करत आहेत. या घटनेनंतर पसार झालेल्या रिक्षा चालकाचाही पोलिस शोध घेत आहेत. तर या हत्येप्रकरणी खुन्यांना हुडकून काढण्यासाठी लोहमार्ग पोलिसांसह शहर पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरविली आहेत.

एकीकडे कल्याण आणि डोंबिवली शहराला जोडणाऱ्या ९० फूट समांतर रस्त्यावर दिवसा प्रेमी युगलांची गर्दी असते. तर रात्रीच्या सुमारास गर्दुल्ल्यांचा मोठ्या संख्येने वावर असतो. या भागात चोऱ्या, वाटमाऱ्या, लुटमारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून येथील नागरिक भीतीच्या छायेत जगत आहेत. त्यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांच्या गस्ती वाढवाव्यात अशी स्थानिक रहिवाशांकडून मागणी केली जात आहे.

तर दुसरीकडे वाढत्या गुन्हेगारीमुळे कल्याण-डोंबिवलीकर भीतीच्या सावटाखाली जीव मुठीत धरून राहत आहेत. गळा चिरून हत्या झाल्यानंतर कल्याण -डोंबिवली हादरली आहे. लवकरच या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news