

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा शनिवारी निकाल जाहीर होणार आहे. याबाबत मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. कोण उधळणार गुलाल आणि कुणाचे होणार हाल याबाबत जोरदार चर्चा असून शनिवारी दुपारपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. जाहीर झालेल्या सर्व्हेक्षणामध्ये काँग्रेसला कौल मिळाला आहे. तर भाजप पिछाडीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी काँग्रेसचे कार्यकर्ते जोमात आहेत.
राज्यातील 224 विधानसभा मतदारसंघातून 10 रोजी विधानसभेची निवडणूक चुरशीने पार पडली. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात राजकीय चुरस मोठ्या प्रमाणात रंगली आहे. भाजप, काँग्रेस आणि निजदने निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षांतून मोठ्या प्रमाणात रुसव्या फुगव्याच्या घटना घडल्या आहेत. यातून पक्षांतर, आरोप प्रत्यारोप, बंडखोरी यासारख्या बाबींना ऊत आला होता. परिणामी राजकीय पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत भाजपची सत्ता उलथून टाकण्याचा चंग बांधला आहे. तर भाजपकडून हातातील सत्ता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. निजदला राज्यातील आपले अस्तित्व टिकवण्यासाठी कसरत करावी लागली आहे. यातून राजकीय चुरस निर्माण झाली आहे.
निवडणूक पूर्व आणि मतदानानंतर जाहीर झालेल्या सर्वेक्षणातून अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु, राजकीय नेत्यांकडून हे दावे फेटाळून लावण्यात येत आहे. सर्व दावे फोल ठरवत आपलेच सरकार सत्तेवर येणार असल्याचा दावा प्रत्येकांकडून करण्यात येत आहे. यावेळी राज्यात कोणतीही लाट नसल्याने राजकीय पक्षांना कसरत करावी लागली होती.
प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रत्येकांकडून प्रतिष्ठेचा करण्यात आला. तर त्यानंतर पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांवर राळ उडवण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला. काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याचे जाहीरनाम्यात जाहीर करताच भाजपने प्रचाराची दिशा बजरंगीकडे वळविली. प्रत्येक वेळी नेत्यांना एखादा मुद्दा चर्चेत आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागले. यातून मतदारांच्या चांगल्या प्रकारे करमणूक झाली.
वरुणा……………………सिद्धरामय्या/व्ही. सोमण्णा/भारती शंकर
हुबळी-धारवाड मध्य……….जगदीश शेट्टर/ महेश टेंगीनकाई
शिग्गावी………………….बसवराज बोम्मई/यासीर खान पठाण
अथणी…………………..लक्ष्मण सवदी/महेश कुमठळ्ळी
चन्नपट्टण………………….एच. डी. कुमारस्वामी/सी. पी. योगेश्वर
पुतूर………………………आशा तिम्मप्पगौडा/अरुणकुमार पुतीळ/ अशोककुमार रै
कार्कळ…………………..व्ही. सुनीलकुमार/प्रमोद मुतालिक/उदयकुमार शेट्टी
शिकारीपूर………………..बी. वाय. विजयेंद्र/नागराज गौड/जी. मालतेश
चिक्कमंगळूर…………….सी. टी. रवी/ तम्मय्या
हासन……………………प्रीतम गौड/स्वरुप के. सी.
गंगावती…………………परण्णा मुनवळ्ळी/ जनार्दन रेड्डी /इक्बाल अन्सारी
बळ्ळारी शहर……………जे. सोमशेखर रेड्डी/अरुणा लक्ष्मी/नारा भरत रेड्डी
कोरटगेर………………..जी. परमेश्वर/ सुधाकर लाल/ बी.एच. अनिलकुमार