

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : करवीर तालुक्यातील होत असलेल्या 53 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत (kolhapur elections) कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील गट आणि महाडिक गटात लढती होत आहेत. काही गावांमध्ये स्थानिक आघाड्यांमध्ये लढती होत आहेत. करवीर विधानसभा मतदारसंघातील बहुतांश गावांमध्ये आमदार पी. एन. पाटील गट व माजी आमदार चंद्रदीप नरके गट यांच्यात लढती होत आहेत. काही गावांमध्ये काँग्रेस, शिवसेना, शेकाप आघाडी, तर काही गावांत स्थानिका आघाड्यांमध्ये लढती होत आहेत. तालुक्यातील महत्त्वाच्या आणि शहरालगतच्या गावांमध्ये हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळतील. (kolhapur elections)
करवीर तालुक्यात चार गावांतील महिला सरपंच तर 67 ग्रामपंचायत सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाटणवाडी या एकमेव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्य बिनविरोध निवड झाली आहे. सडोली दु. मध्ये सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत, तर सरपंचपदासाठी दोन सख्ख्या चुलत भावांमध्ये लढत होत आहे. वसगडे येथे लोकनियुक्त महिला सरपंच बिनविरोध निवड झाली असून, दहा सदस्यांची बिनविरोध निवड झाली. तालुक्यात 53 पैकी 49 गावांत सरपंचपदासाठी, तर 53 पैकी 51 गावांत सदस्यपदांसाठी रणधुमाळी होणार आहे. 49 गावांमध्ये सरपंचपदासाठी 161, तर 51 गावांमध्ये 542 ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी 1,378 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
वसगडे ग्रामपंचायत निवडणुकीत लोकनियुक्त महिला सरपंच म्हणून योगिता तेजस बागडी यांच्यासह इतर दहा सदस्यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित सात जागांसाठी एकोणीस उमेदवार रिंगणात आहेत. कंदलगाव सर्वसाधारण सरपंचपदासाठी आ. सतेज पाटील गटाकडून उत्तम पाटील, महाडिक गटाकडून राहुल पाटील, अपक्ष अजित पुंदीकर अशी तिरंगी लढत होत आहे. 11 सदस्यपदांच्या जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात आहेत.
वळिवडेमध्ये दुरंगी लढत होत आहे. सरपंचपदासह अठरा जागांसाठी चुरशीने लढत होणार असून सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. संगीता पंढरे या महाडिक गटाच्या आहेत, तर रूपाली कुसाळे सतेज पाटील गटाच्या आहेत. कसबा बीड, सावरवाडीमध्ये आ. पी. एन. पाटील गट व चंद्रदीप नरके गटात लढती होत आहेत. बोलोली येथे स्थानिक आघाड्यांमध्ये दुहेरी लढत आहे.
उजळाईवाडी ग्रामपंचायत निवडणूक अतिशय चुरशीची होणार असून स्थानिक तीन आघाड्यांत ही निवडणूक लढवली जाणार आहे. गोकुळ शिरगावात स्थानिक आघाड्यांमध्ये निवडणूक लढवली जात आहे. हाय व्होल्टेज म्हणून येथील निवडणुकीकडे पाहिले जात आहे. कणेरी ग्रामपंचायत निवडणूक स्थानिक तीन आघाड्यांमध्ये लढवली जात असून सरपंचपद खुले असल्याने सरपंचपदासाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत. कणेरीवाडी ग्रामपंचायत निवडणूक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत विरुद्ध पांडुरंग खोत या दोन गटांमध्ये थेट लढत होणार आहे. नेर्ली येथे गोकुळचे संचालक प्रकाश पाटील गटाची अण्णासो पाटील, मंगल पाटील यांच्या गटाशी थेट लढत होणार आहे.
शेळकेवाडी येथे दोन्ही गटांच्या माजी सरपंचांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथे पक्षीय लढतीपेक्षा गटातटाच्या राजकारणाने स्थानिक नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नंदवाळमध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशा पक्षीय राजकारणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. वाकरे व चिंचवडेत स्थानिक आघाडीतील लढतीत अपक्षांची उमेदवारी आघाडी बिघडवणारी ठरणार आहे. चिंचवडे तर्फ कळे (ता. करवीर) येथे राजर्षी शाहू विकास आघाडी व शिवशंभो विकास आघाडी या दोन स्थानिक आघाडीच्या उमेदवारांसह एकूण तीन उमेदवार रिंगणात आहेत.
* गांधीनगर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तारूढ जय झुलेलाल विकास मंच व भारतीय जनता पक्ष-भारतीय सिंधू सभा पुरस्कृत गांधीनगर एकता मंच यांच्यात लढत होत आहे. सत्तारूढ आघाडी काँग्रेसचे नेते आ. सतेज पाटील गटाची आहे, तर विरोधी गांधीनगर एकता मंच हा महाडिक गटाचा आहे. लोकनियुक्त सरपंचासह अठरा जागांसाठी चुरशीने लढत होत आहे.
* शहरालगतच्या वडणगे येथे सरपंच पदासाठी चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बी. एच. पाटील गट आणि सदाशिव पाटील (मास्तर) गट या दोन गटांत ग्रामपंचायत सदस्यपदासाठी प्रमुख लढत आहे. उंचगाव ग्रामपंचायतीमध्ये काट्याची टक्कर आहे. सरपंच पद इतर मागासवर्गा साठी राखीव आहे. सतरा ग्रामपंचायत सदस्यांसाठी आमदार सतेज पाटील गट आणि माजी आमदार अमल महाडिक गट यांच्यात थेट लढत होत आहे.