कणेरी मठावर कर्नाटक भवनसाठी पाच कोटी : कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

कणेरी मठावर कर्नाटक भवनसाठी पाच कोटी :  कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कणेरी मठ येथे उभारण्यात येणार्‍या कर्नाटक भवनसाठी यापूर्वी तीन कोटी दिले असून त्यासाठी आणखी दोन कोटी देऊ, अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली. देशातील मठांनी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणार्‍या सिद्धगिरी मठाचा आदर्श घ्यावा, असे आवाहनही बोम्मई यांनी केले.

सिद्धगिरी मठ कणेरी येथे आयोजित केलेल्या 'सहृदयी संत समावेश' संमेलनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एल. संतोष होते. अद़ृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, शंकरूढ स्वामी, आत्माराम स्वामी हे प्रामुख्याने उपस्थित होते.

सिद्धगिरीचे उपकेंद्र कर्नाटकात व्हावे

सिद्धगिरी मठाचे उपकेंद्र कर्नाटकात व्हावे यासाठी कर्नाटक सरकार जमिनीसह आवश्यक ती मदत करेल. गोरक्षण, शेतकर्‍यांचे रक्षण, कृषी, संस्काराचे रक्षण, भविष्याचे रक्षण करणारे एक अभिनव केंद्र म्हणजे सिद्धगिरी मठ आहे. काडसिद्धेश्वर स्वामीजींचे कार्य महान आहे. ते पाहून त्यांच्या चरणी लीन व्हावे लागते. जन्मभूमी आणि कर्मभूमीसह मातृभूमीही महत्त्वाची आहे. नव्या पिढीस संस्काराची बीजे पेरण्यासाठी मठांचे अस्तित्व टिकणे गरजेचे असल्याचेेही बोम्मई म्हणाले.

कणेरी मठ म्हणजे ऊर्जास्रोत

संत बसवेश्वर यांनी 'कर्म हेच कैलास' हा मंत्र सांगितला आहे, पण या मंत्राचा पूर्ण अनुभव स्वामींच्या जीवनात येतो. शिक्षणापासून कृषी, गोवंश, अध्यात्म, समाज, महिलांची प्रगती, आपत्कालीन मदत, पुनर्वसन, औषध निर्मिती, वैद्यकीय सेवा अशा असंख्य गोष्टींना स्पर्श करत एक आदर्शाचा मापदंड स्वामींनी घालून दिला आहे. सिद्धगिरी मठ म्हणजे अध्यात्म आणि समाजोपयोगी प्रकल्पांचे केंद्र असून स्वामी सर्वांसाठी ऊर्जास्रोत आहेत, असे गौरवोद्गार केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काढले.

कणेरी मठाकडून राज्यकर्त्यांना दिशादर्शन

अनेक आक्रमणे येऊनही आपली संस्कृती टिकली. कारण आपल्या संस्कृतीसाठी घर, मठ, मंदिर हे पायाभूत घटक आहेत. यातूनच संस्कृतीचे जतन आणि संवर्धन होत आले आहे, असे सांगून भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एल. संतोष म्हणाले, घरातील संस्कारापासून ते संस्कृतीच्या पुनरुत्थानापर्यंत काडसिद्धेश्वर स्वामींनी कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याचे भारतीय समाजावर ऋण राहतील. राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करून दिशा दाखवण्यासाठी जसे प्राचीन काळी संत होते तसे आज काडसिद्धेश्वर स्वामी आहेत.

यावेळी कर्नाटकचे पायाभूत विकास मंत्री व्ही. सोमन्ना, लघू व मध्यम पाटबंधारे मंत्री गोविंद कारजोळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील, लघु व मध्यम उद्योग मंत्री मुरुगेश निराणी, वस्त्रोद्योग व साखर मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्प, धर्मादाय, हज व वक्फ मंत्री शशिकला जोल्ले, खा. अण्णासाहेब जोल्ले, आ. श्रीमंता पाटील, राघवेंद्र पाटील, बाबू सिंग महाराज तसेच कर्नाटकमधील चारशेहून अधिक संत व मठाधिपती उपस्थित होते.

महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास बेळगाव, हुबळी, धारवाड, यादगिर, बिजापूर, बागलकोट, बिदर, गुलबर्गा, रायचूर, गदग, कोप्पळ आदी भागातून दहा हजारांहून अधिक भाविक उपस्थित होते.

मठ म्हणजे नव्या पिढीसाठी संस्कार केंद्र

'पुण्यकोटी' प्रकल्पाच्या माध्यमातून कर्नाटक सरकार गोवंश रक्षणाचे काम करते. कणेरी मठ येथील काडसिद्धेश्वर स्वामी यांनी लोकसहभागातून उभारलेली अभिनव गोशाळा आणि मठाचे विविध उपक्रम दीपस्तंभाप्रमाणे काम करत आहेत. मठावरील विविध उपक्रम नव्या पिढीसाठी उपयुक्त असल्याचा विश्वास बोम्मई यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news