

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : गोरेगाव येथील एका अपघातप्रकरणी सिनेअभिनेत्री कंगना राणावत च्या माजी स्पॉटबॉयला कुरार पोलिसांनी अटक केली. रिझवान इक्बाल सय्यद असे त्याचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पादचार्याला धडक देऊन अपघाताची माहिती पोलिसांना न देता तसेच जखमी पादचार्याला कुठलीही वैद्यकीय मदत न पुरविता रिझवान बाईक टाकून पळून गेला होता.
अनिता पटेल ही महिला गोरेगाव येथील संतोषनगर, फिल्मसिटी रोडवर राहते. मृत भरत पटेल हा तिचा पती असून तो हिरा मार्केटमध्ये कामाला आहे. 19 डिसेंबरला भरत हा कामावरून घरी येत होता. यावेळी ओबेरॉय मॉलसमोरील जनरल ए. के वैद्य मार्गावर एका भरवेगात जाणार्या बाईकस्वाराने त्याला धडक दिली होती. अपघातानंतर बाईकस्वार बाईक टाकून पळून गेला होता.
जखमी झालेल्या भरतला स्थानिक रहिेवाशांनी सुरुवातीला खासगी आणि नंतर ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला नंतर केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान 26 डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिंडोशी पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर कुरार पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. अपघातानंतर बाईकस्वार त्याची बाईक टाकून पळून गेला होता. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून या चालकाचा शोध सुरू केला होता.
ही शोधमोहीम सुरु असतानाच रिझवान सय्यदला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याच बाईकवरून हा अपघात झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर त्याला अटक करून बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयात त्याला जामिनावर सोडून दिले. रिझवान हा पूर्वी कंगना राणावत कडे स्पॉटबॉय म्हणून कामाला होता. नंतर त्याने ही नोकरी सोडून दिली होती.