

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातील वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी रेल्वेने कोळशाची वाहतूक पूर्ण क्षमतेने करण्यास सुरुवात केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस दररोज कोळशाच्या 435 मालगाड्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये पोहोचविण्यात येत होत्या. त्याची संख्या आता वाढवून दररोज 487 मालगाड्या कोळशाची वाहतूक करीत आहेत.ऑक्सिजन स्पेशल ट्रेनप्रमाणेच कोळसा स्पेशल ट्रेन सुद्धा लवकरच धावणार आहेत.
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये मध्य रेल्वेद्वारे कोळशाची वाहतूक केली जाते. राज्य सरकारने कोळशाची कमतरता असल्याचे म्हटले आहे. परंतु रेल्वेच्या आकडेवारीनुसार राज्यातील कोळशाच्या वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. वर्ष 2020-21मध्ये मध्य रेल्वेने 30.7 मेट्रिक टन कोळशाची वाहतूक केली. तर वर्ष 2019-20मध्ये 32 मेट्रिक टन कोळशाची वाहतूक केली होती. कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यात वीज संकट निर्माण होण्याची शक्यता होती. परंतु आता कोळशाच्या वाहतुकीत वाढ केल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
सध्या कोळशाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी 59 वॅगनच्या (डबा) मालगाड्या चालविण्यात येत आहेत, प्रत्येक वॅगनमध्ये सुमारे 60 ते 75 टन कोळसा भरलेला असतो. महाराष्ट्र आणि देशातील विविध वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये कोळशाची जलद वाहतूक करण्यासाठी मालगाड्यांचा वेगही वाढविला आहे. त्यातच आता कोळसा स्पेशल ट्रेन देखील धावतील.