

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी शनिवारी चौथ्या दिवशीही आक्रमकच राहिल्याने ऐन दिवाळीच्या तोडांवर राज्यातील एसटीची वाहतूक ठप्प होत आहे. शनिवारीही राज्यातील 25 डेपो बंदच राहिले. महामंडळानेही आक्रमक पवित्रा घेत सुमारे चार हजार कर्मचार्यांना बडतर्फीच्या नोटिसा पाठविण्याचे आदेश दिले आहेत.
एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने पुकारलेले उपोषण मागे घेतले असताना नियमबाह्यरीत्या आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचार्यांवर तातडीने सेवा समाप्तीची कारवाई करण्याची नोटीस देण्यात यावी, असे लेखी आदेश महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिले आहेत. औद्योगिक न्यायालयानेदेखील हे आंदोलन, संप बेकायदा ठरवला असून प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. सुमारे 4 हजार कर्मचार्यांना बडतर्फीच्या नोटिसा देण्यात येणार आहेत.
एसटीच्या विलीनीकरणासाठी पुकारलेले हे आंदोलन जनतेसह कर्मचार्यांना वेठीस धरणारे आहे. एसटीचे विलीनीकरण अशक्य असल्याचे मत सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री असताना मांडले होते. तेव्हा संप करणार्या 1 हजार 100 कर्मचार्यांच्या सेवा समाप्तीचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता.
त्यावेळी या कर्मचार्यांना परत सेवेत सामावून घेण्याचा निर्णय तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला होता, याकडे महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी लक्ष वेधले.