एव्हरग्रीन नथ

एव्हरग्रीन नथ
Published on
Updated on

महाराष्ट्रीयन स्त्रीचा साजशृंगार हा नथीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. नथ हा नासिकाभूषणातील एक महत्त्वाचा प्रकार असून हिंदू स्त्रियांत तो सौभाग्यालंकार म्हणूनच रूढ झाला आहे. नथीमध्ये पूर्वीपासूनच्या पारंपरिक डिझाईन्स रूढ आहेत.

मध्यंतरी, व्हॉटस्अ‍ॅपवर 'नथीचे चॅलेंज' बरेच गाजले होते. अनेक तरुणींनी-महिलांनी नाकात नथ घालून आपले फोटो 'स्टेटस'ला ठेवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसे पाहायला गेले, तर नथ ही महाराष्ट्रीयन संस्कृतीतील पारंपरिक दागिना आहे. नथ घालणारी काकुबाई असाच काही समज असायचा किंवा सणवार, डोहाळेेजेवण, लग्न समारंभ अशावेळी नथीचे अस्तित्व दिसून यायचे; पण जसजशी फॅशन बदलत गेली, तसतशी नथ घालण्याचा मोह सर्वांनाच होऊ लागला. अगदी हिंदी सिनेमातील आघाडीच्या नायिकांनाही नथीने वेड लावले अन् मराठमोळी दिसण्यासाठी नथ घालून थिरकण्यासाठी या मॉडर्न लेडीही सज्ज झाल्या.

स्त्रियांच्या बिंदीपासून पैंजणापर्यंतच्या अलंकारात कमालीचं वैविध्य आढळतं. नाकातील टपोर्‍या मोत्यांची नथ आणि चमचमणार्‍या चमकीच्या प्रेमात तुम्हीही असालच. सगळा साजशृंगार पूर्ण झाला, तरी ज्याच्याशिवाय चेहर्‍याला रूप येत नाही असा दागिना म्हणजे नाकातील चमकी, नथ हे आभूषण. नासिकाभूषण हे सौभाग्यलंकार मानले गेल्याने प्रत्येक प्रांतात आणि परंपरामध्ये तिला वेगळे स्थान आहे.

पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये अतिशय नावाजलेला असा हा दागिना. नऊवारी साडी असेल तर नथ हवीच. नथीमध्ये पूर्वीपासूनच्या पारंपरिक डिझाईन्स रूढ आहेत. यात मराठा पद्धतीची नथ थोडी मोठी असते, तर ब्राह्मणी पद्धतीची नथ नाजूक असते. याशिवाय नक्षीदार विणकाम केल्यासारखी सरजाची नथही मिळते. महाराष्ट्रीयन स्त्रीचा साजशृंगार हा नथीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. नथ हा नासिकाभूषणातील एक महत्त्वाचा प्रकार असून हिंदू स्त्रियांत तो सौभाग्यालंकार म्हणूनच रूढ झाला आहे. आपल्या सवाष्णीचं लेणं म्हणून मान्यता पावलेली नथ, तिच्या आगळ्या नजाकतीसाठी अजूनही प्रसिद्ध आहे.

पेशवेकाळापर्यंत नथ म्हणजे सोन्याचे एक कडे व त्याला अडकवलेले काही मोती असेच या दागिन्याचे स्वरूप होते. पेशवेकाळात जेव्हा महाराष्ट्राचे वैभव वाढले तेव्हा येथील तालेवार लोकांनी या मूळच्या नथीचे रूप बदलून तिला मोती जडवून व रत्ने लावून नथीचे नवीन स्वरूप तयार केले. आकाराच्या बाबतीत अधिक कलात्मक असलेले हे नासिकाभूषण, महाराष्ट्रात सोन्याचा फास असलेल्या तारेत सात किंवा अधिक मोती व मधोमध लाल रत्ने बसविलेली, असंच नथीचं स्वरूप पाहावयास मिळतं. नथीला मुखरा असेही म्हणतात. नथ ही सामान्यत: एकाच नाकपुडीत घालतात. सौभाग्याची निदर्शक म्हणून विशेषत: सौभाग्यवती स्त्रिया नथ वापरतात.

– मृदुला फडके

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news