एज्यु-दिशा प्रदर्शन करिअरसाठी ठरतेय गुरुकिल्ली

एज्यु-दिशा प्रदर्शन करिअरसाठी ठरतेय गुरुकिल्ली
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दहावी-बारावीनंतर नेमके कोणते करिअर निवडायचे आणि त्यासाठी मार्गदर्शन कोण करणार, या संभ्रमात असलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत 'पुढारी' एज्यु-दिशा ऑनलाइन 2021 हे शैक्षणिक प्रदर्शन आणि वेबिनार मार्गदर्शनाची गुरुकिल्लीच ठरत आहे. विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठावर करिअर घडविण्यासाठीचे मार्गदर्शन आणि त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम शिकविणार्‍या शैक्षणिक संस्था यांची ओळख होत आहे. त्यामुळे प्रदर्शनाला विद्यार्थी आणि पालकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.

प्रदर्शनाचे सहयोगी प्रायोजक एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी पुणे, तर सहप्रायोजक डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ पुणे व पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पुणे हे आहेत. प्रदर्शनाच्या माध्यमून शैक्षणिक करिअरचा महत्त्वाचा प्रश्न सुटत असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी प्रदर्शनाचा कालावधी वाढविण्याची मागणी केली होती. त्यांच्या आग्रहास्तव येत्या 10 ऑगस्टपर्यंत 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्वांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य असणार आहे.

पहिल्या दिवशी मुंबईच्या लॉ अँड ऑर्डरचे जॉइंट सी. पी. विश्वास नांगरे पाटील, संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील, डीन ऑफ इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शनचे शीतलकुमार रवंदळे, आयटी प्रोफेशनल दीपक शिकारपूर यांनी विविध विषयांवर विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. दुसर्‍या दिवशी इंद्रजित देशमुख यांनी 'आताच्या काळात स्वत:ला मोटिव्हेटेड कसे ठेवावे' आणि इनोव्हेशन ऑफिसर हर्षद ठाकूर यांनी 'अभियांत्रिकीमधील कल्पना' या विषयावर विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले.

दै. 'पुढारी'च्या वतीने 2009 पासून 'पुढारी एज्यु-दिशा' शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांकरिता यंदा प्रथमच ऑनलाइन स्वरूपाचे राज्यस्तरीय प्रदर्शन घेण्यात येत आहे. दहावी-बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांपुढे शिक्षणाची अनेक दालने असतात. विद्यार्थी व पालक करिअरची दिशा ठरविण्याविषयी योग्य पर्यायाच्या शोधत असतात. अशावेळी विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय ठेवून त्यांना करिअरबाबत योग्य मार्गदर्शन व्हावे, या हेतूने दै. 'पुढारी'ने 12 वर्षांपूर्वी एज्यु-दिशा शैक्षणिक प्रदर्शनाची सुरुवात केली. दरवर्षी प्रत्यक्ष होणारे हे प्रदर्शन कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे या वर्षी ऑनलाइन पद्धतीने होत आहे.

असे पाहता येईल एज्यु-दिशा प्रदर्शन

प्रदर्शनात दरवर्षीप्रमाणे निरनिराळ्या विद्या शाखांची 35 हून अधिक दालने आहेत. www.pudhariexpo.com या वेबसाइटवर क्लिक केल्यानंतर प्रदर्शनात सहभागी होता येणार आहे. यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रदर्शन हॉल व लेक्चर हॉल, असे दोन पर्याय असतील. यात प्रदर्शन हॉलमध्ये शैक्षणिक संस्थांचे स्टॉल दिसतील. त्यामध्ये विविध शिक्षण संस्थांची माहिती, व्हिडीओ तसेच इतर माहिती मिळेल. त्याचबरोबर संबंधित शिक्षण संस्थेस ऑडिओ व व्हिडीओ कॉल करता येणार आहे.

'पुढारी'वर कौतुकाचा वर्षाव

प्रदर्शनासाठी हजारो विद्यार्थ्यांनी विनामूल्य नोंदणी केली आहे. संबंधित विद्यार्थी दिवसभर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतात आणि त्याचबरोबर राज्यातील शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, कोचिंग क्लासेस यांच्या ऑनलाइन स्टॉलला भेट देऊन त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या अभ्यासक्रमांची माहिती घेतात आणि योग्य करिअरची निवड करण्याचे निश्चित करतात. शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या संधींविषयी विनामूल्य माहिती मिळत असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक आनंद व्यक्त करीत आहेत. शैक्षणिक करिअर निवडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे 'पुढारी समूहा'वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

विपरीत परिस्थितीवर मात करणारेच यशस्वी

गेल्या पावणेदोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्वकाही बंद असून, या काळाने कमीत कमी गरजांमध्ये जगता येते, हे शिकविले. त्यात भय, भीती, सामाजिक तिस्काराची भावना होतीच; तर दुसर्‍या बाजूला माणुसकीही होती. अशा विपरीत परिस्थितीवर मात करणारेच आयुष्यात यशस्वी होऊ शकतात, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी डॉ. इंद्रजित देशमुख यांनी केले.

संजय घोडावत प्रस्तुत आणि दै. 'पुढारी' आयोजित 'एज्यु-दिशा' या लाइव्ह वेबिनारमध्ये 'आताच्या काळात स्वत:ला मोटिव्हेटेड कसे ठेवावे' या विषयावर सांगली जिल्ह्यातील विटा येथील स्व. हणमंतराव पाटील ट्रस्ट संचलित आदर्श महाविद्यालयातून डॉ. इंद्रजित देशमुख व्याख्यान देत होते. सुरुवातीला डॉ. देशमुख यांचे स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष वैभव पाटील आणि आदर्शचे प्राचार्य भाऊसाहेब कोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दत्ता पाटील यांनी केले.

डॉ. देशमुख म्हणाले, गेल्या दोन वर्षांत आपण सर्वजण अभूतपूर्व परिस्थितीतून जात आहोत. सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, मान, पदाच्या मागे धावणारे जग कोरोनामुळे पूर्णत: थांबले आहे. जगायला काय लागते, याचाही अनुभव आला आहे. दोन बर्मोडा आणि टी- शर्टवर जगता येतो, हे सध्याच्या परिस्थितीतून समोर आले आहे. माहितीचा भांडार उपलब्ध होत असून, या माहितीचे रूपांतर ज्ञानात झाले पाहिजे. परंतु, येणार्‍या माहितीपैकी खरी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे, हे शिक्षकांपुढे मोठे आव्हान आहे.

मोटिव्हेशनवर जागतिक लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांतील उदाहरणे देत देशमुख यांनी मार्गदर्शन केले. आपण जन्माला का आलो, हे कळते. पण, कसे जगायचे, हे कळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे प्रेरणा घेतलेली नसते. ध्येयनिश्?चितीसाठी परिश्रम आणि जगातील चांगल्या म्हणजेच प्रेरणादायी व्यक्‍तींचा सहवास लाभणे आवश्यक आहे. ज्यांना का जगायचे, कसे जगायचे हे कळले, की आयुष्याचा मार्ग सुकर होतो.

सकारात्मकता यशाचा पाया…

पराक्रम घडविण्यासाठी येणार्‍या अडचणींवर लक्ष असेल, तरच यश मिळू शकते. जी व्यक्‍ती विपरीत परिस्थितीत स्वतःला सिद्ध करू शकते, तीच आयुष्यात यशस्वी होते. त्यासाठी सकारात्मकता आवश्यक आहे. पराभवाकडून यशाकडे जाताना स्वतःमध्ये बदल घडविले, तरच यश मिळेल, असा मोलाचा सल्‍ला डॉ. देशमुख यांनी दिला.

मोटिव्हेशन म्हणजे काय?

शेवटच्या क्षणापर्यंत पुरुषार्थ जागा ठेवणे, मिळालेल्या क्षणांचा योग्य विनियोग करणे, असलेल्या परिस्थितीला प्रतिक्रिया न देता प्रतिसाद देणे, म्हणजेच प्रेरणादायी. तसेच प्रतिक्रियावादी न होता प्रतिसादवादी होणे म्हणजेच प्रेरणादायी होय, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

शाळास्तरावरच संशोधन व्हावे

सध्याच्या घडीला भारतीय मार्केट जास्तीत जास्त परदेशी कंपन्यांनी व्यापले आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे चिनी कंपन्यांनी सर्वाधिक भारतीय मार्केटवर कब्जा केला आहे. हे सर्व संशोधनामुळे शक्य होत आहे. त्यामुळे आपल्या देशातही चिनी लोकांप्रमाणे छोट्या-मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी व अन्य वस्तूंचे इनोव्हेशन व्हायला हवे. त्याची सुरुवात शाळांपासून झाली, तर खूपच चांगले आहे. त्याकरिता शाळास्तरावर प्रयत्न करायला हवेत, असे मत इनोव्हेशन ऑफिसर हर्षद ठाकूर यांनी व्यक्‍त केले.

संजय घोडावत प्रस्तुत आणि दै. 'पुढारी' आयोजित 'एज्यु-दिशा' या लाइव्ह वेबिनार कार्यक्रमाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी 'अभियांत्रिकीमधील नवकल्पना' या विषयावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. दत्ता पाटील यांनी केले.

ठाकूर म्हणाले की, भारतामध्ये कल्पकपणा, अभियांत्रिकीचे ज्ञान यांची कमतरता नाही. पण, तरीही या बाहेरील कंपन्या भारतीय मार्केटवर कब्जा कसा करतात, हा मोठा प्रश्न आहे. उदाहरणार्थ, आपल्या देशात दरवर्षी सुमारे साडेबारा हजार कोटींची खेळणी विकली जातात. यातला 75 टक्के भाग परदेशातून आयात केला जातो.

या आयातीमध्ये चीनचा सर्वाधिक सहभाग असल्याचे दिसून येते. त्यामुळे आपल्या देशात पाश्‍चात्त्य संस्कृतीवर आधारित सर्व खेळण्यांचे प्रमाण जास्त आहे. भारतीय संस्कृतीवर आधारित खेळणी कुठे आहेत? भविष्यात हे रोखण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करून शाळांमधूनच संशोधक निर्माण करायला हवेत.

संशोधनासाठी शाळांना अर्थसाहाय्य

भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेकडून (एआयटीसी) शाळांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी 'अटल टिंकरिंग लॅब' ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी शासन प्रत्येक शाळेला लॅब उभारण्याकरिता अर्थसाहाय्य आणि अन्य लागणारी सर्व मदत करीत आहे. त्याचा लाभ शाळांनी नक्‍कीच घ्यायला हवा, असेही ठाकूर यांनी या वेळी सांगितले.

पहा व्हिडिओ : महाराष्ट्राचे सर्वात मोठे ऑनलाईन शिक्षण प्रदर्शन आणि वेबिनार मालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news