एकपडदा चित्रपटगृहे राज्यातील ७० टक्के बंदच

एकपडदा चित्रपटगृहे राज्यातील ७० टक्के बंदच
Published on
Updated on

गेली 18 महिने बंद असलेली एकपडदा आणि बहुपडदा चित्रपटगृहे खुली करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. परंतु, कर्जाचा डोंगर, थकीत कर आणि चित्रपटगृहांच्या दुरवस्थेमुळे राज्यातील सुमारे 60 ते 70 टक्के एकपडदा चित्रपटगृहे (सिंगल स्क्रीन) बंदच ठेवणे चालक-मालकांनी पसंत केले. शुक्रवारी सुरू झालेल्या एकपडदा चित्रपटगृहांत केवळ 5 ते 10 टक्के आणि बहुपडदा (मल्टीप्लेक्स) चित्रपटगृहातही 10 ते 15 टक्के प्रेक्षक उपस्थित होते.

कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांच्या संघटनांनी वारंवार मागणी केल्यानंतर 'ब्रेक द चेन'अंतर्गत राज्यातील नाट्य आणि चित्रपटगृहे शुक्रवारी शासनाने खुली केली. कोरोना महामारीत शासनाने सर्वांत आधी चित्रपट आणि नाट्यगृहे बंद केली आणि 'अनलॉक'च्या शेवटच्या टप्प्यात ती खुली केली; त्यासाठीही 50 टक्के प्रेक्षकाची मर्यादा घालण्यात आली.राज्य शासनाने 11 ऑक्टोबरला त्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. तब्बल 18 महिने बंद असलेल्या चित्रपटगृहांची डागडुजी, कर्मचार्‍यांचे लसीकरण आदी कामे केवळ 10 दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान मालक-चालकांपुढे होते. आमच्यावरील थकीत कराच्या ओझ्याचा शासनाने कोणताही विचार केला नाही, असा एकपडदा चित्रपटगृह मालकांचा आरोप आहे. कर्जाचा डोंगर, चित्रपटगृहांची दुरवस्था यामुळे राज्यातील सुमारे 450 चित्रपटगृहांपैकी तब्बल 60 ते 70 टक्के चित्रपटगृहे शुक्रवारी 'अनलॉक' झालीच नाहीत.

त्यामुळे दोन्ही प्रकारची चित्रपटगृहे प्रेक्षकांनी भरभरून वाहण्यासाठी बिग बजेट, बिग बॅनर आणि 100 प्रेक्षक उपस्थिती आवश्यक आहे. चित्रपटगृहे गजबजली तरच व्यवसायाला पुन्हा झळाळी मिळण्याची आशा आहे.

चित्रपटगृहांच्या मालमत्ता करात कपातीसह अन्य मागण्या आहेत. त्या मागण्या सरकारने ऐकल्याशिवाय आम्हाला चित्रपटगृहे सुरू करणे शक्य नाही. सुरू झालेली चित्रपटगृहे केवळ अपवाद असतील, असे ठाण्यातील वंदना चित्रपटगृहाचे संचालक म्हणाले.

राज्यात सुमारे 341 मल्टीप्लेक्स चित्रपटगृहे असून, ती सुरू झाली आहेत. मल्टीप्लेक्समध्ये जुनेच चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. त्याला प्रेक्षकांचा 10 ते 15 टक्केच प्रतिसाद लाभला. नवे बिग बजेट आणि बिग बॅनर चित्रपट तसेच 100 टक्के प्रेक्षक उपस्थिती असेल तरच आम्हाला आधार मिळेल. 50 टक्के उत्पन्न आणि 100 टक्के खर्चात आम्ही व्यवसाय कसा करणार?

प्रकाश चाफळकर, मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया

 

60 ते 70 टक्के एकपडदा चित्रपटगृहे बंदच आहेत. जी सुरू झाली, त्यांनी इंग्रजी चित्रपट लावले. ज्यांच्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान नाही, त्यांनी व्यवसाय बंद ठेवला. सुरू झालेल्या चित्रपटगृहांना अवघा 5 टक्के प्रतिसाद मिळाला.
नितीन दातार,
अध्यक्ष, सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स
असोसिएशन ऑफ इंडिया

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news