

नवी मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ होणार आहे. नवी मुंबई महापालिकेच्या प्रस्तावाला नगरविकास विभाग मंजुरी देणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सांगितले.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात 1 लाख 97 हजार सदनिकाधारक 500 चौरस फुटांच्या घरात राहतात. या सदनिकाधारकांकडून महापालिकेला मालमत्ता कराच्या रूपात 22 कोटी रुपये दर महिन्याला मिळतात. नवी मुंबईत सीबीडी, बेलापूर, नेरुळ, तुर्भे, घणसोली, कोपरखैरणे, सानपाडा, वाशी आणि ऐरोलीसह दिघा विभागातील रहिवाशांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
ठाणेकर नागरिकांच्या 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफीचा प्रस्ताव मागील महिन्यात झालेल्या महासभेत मंजूर झाला होता. त्यानंतर ज्यांच्या घरांचे चटईक्षेत्र 500 चौरस फुटांचे असेल किंवा त्यापेक्षा कमी अशा सर्वच निवासी मालमत्ताधारकांना आता मालमत्ता करमाफी करण्याचा ठराव करण्यात आला असून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली आहे.
हा ठराव मंजूर झाल्यास पालिकेच्या तिजोरीवर सुमारे दीडशे कोटींचा बोजा पडेल, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. ठाणे महापालिकेने लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावा. त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.