

मुंबई ; पुढारी डेस्क : ओमायक्रॉनमुळे आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. तथापि, 'वंदे भारत' मिशन अंतर्गत एअरबबल चा द्विपक्षीय करार झालेल्या 32 देशांसाठी भारतातून विमाने सुरूच राहणार आहेत.
एअरबबल कराराअंतर्गत देशांमध्ये अमेरिका, युरोप संयुक्त अरब अमिरात तसेच भूतान आणि केनिया आदी देशांचा समावेश आहे. हवाई वाहतूक संचालनालयाने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. 31 जानेवारीपर्यंतचे निर्बंध आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीला लागू नसतील.
तसेच हवाई वाहतूक संचालनालयाने ठरवून दिलेल्या काही ठराविक मार्गावर हवाई वाहतूक सुरूच राहील, असे संचालनालयाने स्पष्ट केले आहे. कोरोना महामारीमुळे मार्च 2020 पासून सर्वसाधारण आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले होते.
यावर्षीच्या नोव्हेंबरमध्ये केंद्र सरकारने हवाई वाहतुकीचा आढावा घेत सर्वसाधारण आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक 15 डिसेंबरपासून पूर्ववत होईल, असे जाहीर केले होते. मात्र, जगभरात ओमायक्रॉनचा उद्रेक झाला आणि या निर्णयाचा फेरविचार करून 31 जानेवारी 2022 पर्यंत हे निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय संचालनालयाने घेतला.
राज्यसभेत या संदर्भातील लेखी उत्तरात केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे की, जगभरात गतीने चाललेल्या कोरोना प्रतिबंधक लसीमुळे तसेच कोरोनाचा प्रभाव ओसरत चालल्याने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ओमायक्रॉनमुळे जगाची चिंता पुन्हा वाढल्याने हवाई वाहतूक सुरू करण्यासंदर्भात आढावा घेतला गेला आणि निर्बंधांचा कालावधी वाढवण्यात आला.